१० बाय १०च्या खोलीतून २८० प्रकारच्या बोगस पदव्या! कोरेगावातील विठ्ठलाची लीला देशव्यापी -आॅनलाईन युनिव्हर्सिटीचा कारभारसुद्धा आॅनलाईनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:40 AM2018-03-31T00:40:30+5:302018-03-31T00:40:30+5:30
कोरेगाव : कोरेगावातील सुभाषनगरसारख्या उपनगरामध्ये १० बाय १०च्या खोलीत इंटरनेटद्वारे आयनॉक्स इंटरनॅशनल युनिर्व्हसिटी चालविणारा तथाकथित कुलपती डॉ. विठ्ठल श्रीरंग मदने
साहिल शहा।
कोरेगाव : कोरेगावातील सुभाषनगरसारख्या उपनगरामध्ये १० बाय १०च्या खोलीत इंटरनेटद्वारे आयनॉक्स इंटरनॅशनल युनिर्व्हसिटी चालविणारा तथाकथित कुलपती डॉ. विठ्ठल श्रीरंग मदने (५० रा. कोरेगाव) याच्या लीला देशव्यापी असून, त्याने आजवर अल्पदरात २८० प्रकारच्या विविध बोगस पदव्यांचे वाटप केले असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मदने याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली आहे.
स्वत: अल्पशिक्षित असूनदेखील त्याने निरनिराळ्या संस्था व विद्यापीठांकडून अनेक पदव्या मिळविल्या आहेत. तो डॉक्टर म्हणून समाजात उजळ माथ्याने वावरत होता. त्याच्या आॅनलाईन कामाचा पसारा पाहून तपास यंत्रणादेखील चक्रावून गेली आहे. स्वत:कडे एकही कागद न ठेवणाऱ्या मदने याने सर्वच कामकाज आॅनलाईन पद्धतीने चालविले असल्याने तपासाची व्याप्ती आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.
विठ्ठल मदने याने बोगस विद्यापीठामार्फत डॉक्टर इन लिटरेचर (डी. लिट.), डॉक्टर इन ह्युमन राईट्स, डॉक्टर इन एनव्हॉअरमेंटल स्टडीज, डॉक्टर इन लेटर्स, डॉक्टर इन फिलॉसॉफी (पीएच.डी. व मानद पीएच.डी.), डॉक्टर आॅफ मॅथेमॅटिक्स, डॉक्टर आॅफ इंजिनिअरिंग, डॉक्टर आॅफ फाईन आर्टस्, डॉक्टर आॅफ लॉ, डॉक्टर आॅफ डिव्हिनिटी, डॉक्टर आॅफ ह्युमॅनिटीज, डॉक्टर आॅफ युनिव्हर्सिटी, डॉक्टर आॅफ पब्लिक सर्व्हिस, डॉक्टर आॅफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन, डॉक्टर आॅफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, डॉक्टर आॅफ पब्लिक हेल्थ, डॉक्टर आॅफ सायन्स इन सोशल सायन्स, बॅरिस्टर अॅट लॉ, डॉक्टर आॅफ मेडिसीन, डॉक्टर आॅफ सायन्स, (पान १२ वर)
डॉक्टर आॅफ आयुर्वेद, डॉक्टर आॅफ मॅजिक, डॉक्टर आॅफ ह्युमॅनिटीज, डॉक्टर आॅफ सोशल वर्क, डॉक्टर आॅफ सिव्हिल लॉ, डॉक्टर आॅफ हेल्थ सायन्स, डॉक्टर आॅफ को-आॅपरेटिव्ह, डॉक्टर आॅफ एज्युकेशन, आदी पदव्यांचे त्याने बिनबोभाट वाटप केले आहे.
सर्वाधिक पदव्या या ‘डॉक्टर इन फिलॉसॉफी’च्या (पीएच.डी. व मानद पीएच.डी.) आहेत. त्यांची संख्या जवळपास १९४ एवढी आहे. त्याखालोखाल डॉक्टर इन लिटलेचर (डीलिट)चा क्रमांक लागत असून, त्याची संख्या ८६ एवढी आहे. पदव्यांच्या लाभार्थ्यांची यादी त्याने बेवसाईटवरूनच पोलिसांना काढून दिली आहे. या लाभार्थ्यांची केवळ नावे असून, त्यांचे पत्ते नमूद नसल्याने तपासांत अडचणी येत आहेत.
पदवीसाठी पैसेही आॅनलाईन जमा..
सातारा जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला बरोबर न घेता, त्याने विद्यापीठाचा बाजार मांडून पदव्या देण्याचा धडाका लावला. बेवसाईटवर स्वत:च्या नावापुढे कुलपती ही पदवी लावून, त्याने मोबाईल क्रमांकदेखील दिला होता. त्याद्वारे लोकांनी संपर्क साधल्यावर बेवसाईटवर असलेल्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास तो सांगत होता. एका पदवीसाठी कमीतकमी पन्नास हजारांचा दर सांगितला जायचा. पदवीदान सोहळ्यात व्यक्तींसोबत येणाºया इतरांकडून मात्र, मिळेल तेवढी रक्कम खिशात टाकून त्यांना जागच्या जागीही पदव्या दिल्या जायच्या.
वेगवेगळ्या हॉटेलमध्ये पदवीदान
साताºयातील प्रसिद्ध हॉटेलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये होणाºया पदवीदान सोहळ्यांना तो संबंधितांना बोलावून घ्यायचा. एकाच हॉटेलवर भर न देता, वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी वेगवेगळी हॉटेल्स बुक केली जात होती. या कार्यक्रमात त्यांना पदवी प्रमाणपत्र दिले जात होते. ज्यांना पदवी दिली, त्यांच्याबरोबरच्या कोणी लोकांनी पदवी प्रमाणपत्राबाबत विचारणा केली तर त्यांना नाममात्र पैसे रोख स्वरुपात घेऊन पदवी प्रमाणपत्र जागेवरच दिले जात होते.
फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी पुढे यावे
विठ्ठल मदने याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला अटक करून दोन दिवस उलटत आले तरी एकाही पीडित व्यक्तीने तक्रार दिलेली नाही. फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी पुढे येऊन तक्रारी दिल्यास तपास करताना फायदा होईल आणि मदने याचा उद्योग समाजापुढे येईल.
- दादासाहेब चुडाप्पा, पोलीस निरीक्षक, कोरेगाव (जि.सातारा)