दहावी निकालात सातारा विभागात दुसरा!, मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात घट
By प्रगती पाटील | Published: June 2, 2023 03:42 PM2023-06-02T15:42:27+5:302023-06-02T15:43:16+5:30
कॉपीमुक्तीचा फॉर्म्युला सातारा पॅटर्न
सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेमध्ये कोल्हापुर विभागात सातारा द्वितीय क्रमांकावर राहिला. जिल्ह्याचा निकाल ९६.७२ टक्के लागला आहे. यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण २.२८ टक्क्यांनी वाढले आहे. पुन:प्रविष्ठ विद्यार्थ्यांचा जिल्ह्याचा निकाल ६३.४१ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात ०.९१ टक्के इतकी घट झाली आहे.
सातारा जिल्हयात बारावी परिक्षेसाठी ११६ परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आली होती. ७३३ माध्यमिक शाळांमध्ये परिक्षा पार परडली. परीक्षेसाठी ३७ हजार ९३० परिक्षार्थींची नोंदणी झाली होती. प्रत्यक्ष परिक्षेत ३७ हजार ८११ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यातील ३६ हजार ५७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सर्व्हरची ओरड कायम!
आॅनलाईन पध्दतीने दुपारी १ वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर तो पाहण्यासाठी अनेकांनी मोबाईलचा आधार घेतला. एकाचवेळी अनेक जणांनी निकाल सर्च केल्यामुळे मंडळाची वेबसाईट काही वेळासाठी गडबडली. उत्तीर्ण होणार याची खात्री असलेल्यांनी किती टक्के मिळालेत हे पाहण्यासाठी तर पास होण्याची खात्री नसलेल्यांनी निकाल पाहण्याची उत्सुक्ता होती.
कॉपीमुक्तीचा फॉर्म्युला सातारा पॅटर्न!
दहावीच्या परिक्षेत कॉपी करणाºयांची संख्या यंदा घटल्याचे चित्र दिसते. जिल्हा प्रशासनाने वारंवार केलेल्या सुचना, वर्गांवर जाऊन कॉपी करण्याचे दुष्परिणाम यासह प्रबोधन केल्याचा हा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्च २०२२ मध्ये साताऱ्यात ४, सांगलीत ३ आणि कोल्हापुरात ४ असे ११ कॉपीचे प्रकार आढळले होते. मार्च २०२३ मध्ये साताऱ्यात ०, सांगलीत ३ तर कोल्हापुरात २ प्रकरणे अशी एकुण पाच प्रकार समोर आले. चौकशीअंती दोषी आढळल्याने ५ विद्यार्थ्यांना मार्च २०२३ परीक्षेतील गैरमार्ग केलेल्या विषयाची संपादणूक रद्द अशी शिक्षा जाहीर करण्यात आली.
साताऱ्यातील दहावीचा निकाला आशादायी आहे. यंदा सुंपर्ण परिक्षा काळात कॉपी करण्याचा कोणताही प्रकार घडला नाही. कॉपीमुक्तीचा हा फॉर्म्युला विभागात आदर्शवत ठरला आहे. प्रबोधनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या मनात कॉपीविषयी भिती भरल्याने हे शक्य झाले. - प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक