सातारा जिल्ह्यात तब्बल ४२ हजार ८७ रोडरोमिओंना वठणीवर; तीन वर्षांतील लेखाजोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 01:01 AM2019-12-15T01:01:29+5:302019-12-15T01:03:43+5:30
गेल्या पाच वर्षांपूर्वी शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण प्रचंड होते. दिवसाला चार मुलींची छेडछाड होत होती. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी शासनाने निर्भया पथकाची स्थापना केली. मुली, तरुणींना तसेच महिलांची सुरक्षितता व त्यांना तातडीने पोलीस मदत मिळावी म्हणून
दत्ता यादव ।
सातारा : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह तरुणी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्थापन करण्यात आलेल्या निर्भया पथकाने गेल्या तीन वर्षांत सातारा जिल्ह्यात तब्बल ४२ हजार ८७ रोडरोमिओंना वठणीवर आणले. या निर्भया पथकाकडून सातत्याने गस्त घालण्यात येत असल्यामुळे महाविद्यालय आणि शालेय परिसरात होणारे छेडछाडीचे प्रकार रोखण्यास या पथकाला यश आले आहे.
गेल्या पाच वर्षांपूर्वी शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण प्रचंड होते. दिवसाला चार मुलींची छेडछाड होत होती. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी शासनाने निर्भया पथकाची स्थापना केली. मुली, तरुणींना तसेच महिलांची सुरक्षितता व त्यांना तातडीने पोलीस मदत मिळावी म्हणून हे पथक स्थापन करण्यापाठीमागे शासनाचा हेतू होता. तो हेतू आता साध्य होऊ लागल्याचे दिसून येत आहे.
शहरातील शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी हे पथक सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान गस्त घालत आहेत. निर्भया पथकाची गाडी पाहून हुल्लडबाज तरुणांची पाचावर धारण बसत आहे. विद्यार्थिनी, तरुणी, महिलांच्या तक्रारी आल्यास तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत केली जात आहे. अनेकदा मुली तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. त्यासाठी महाविद्यालयात तक्रार पेटीही ठेवण्यात आली आहे.
सात मिनिटांत पोहोचायचं..
एखादा मुलगा मुलीला त्रास देत असेल आणि संबंधित पीडित मुलीने हेल्पलाईनवर तक्रार केल्यास निर्भया पथकाची गाडी त्या ठिकाणी केवळ सात मिनिटांत पोहोचली जावी, यासाठी निर्भया पथक प्रयत्न करते. आत्तापर्यंत ३८ ठिकाणी निर्भयाची गाडी तत्काळ पोहोचली आहे. पोलिसांचा शंभर नंबर नेहमी व्यस्त राहत असल्यामुळे या पथकाचा हेल्पलाईन नंबर १०९१ आणि ९०१११८१८८८ असा आहे. या नंबरवर युवतींनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशी केली जाते कारवाई
समुपदेशन आणि प्रतिबंधात्मक कारवाई करूनही एखाद्या मुलामध्ये सुधारणा होत नाही. त्यावेळी पोलीस पुढचे पाऊल उचलतात. त्याला न्यायालयात पाठवून त्याच्या शिस्तभंगाच्या कारवाईखाली पाचशे ते एक हजार रुपये दंड केला जातो. हा दंड कमी असला तरी संबंधित मुलाचे गुन्हेगारीचे रेकॉर्ड तयार होते.
गाडीमध्ये छुपा कॅमेरा
निर्भया पथकाची गाडी, महाविद्यालय परिसरामध्ये उभी केली जाते. यावेळी सर्वच मुलांवर लक्ष ठेवणे पोलिसांना शक्य होत नाही. त्यामुळे गाडीत असलेल्या छुप्या कॅमेऱ्याने छेडछाड करणाऱ्यांचे चित्रीकरण केले जात आहे. हे फुटेज पाहून महाविद्यालयात जाऊन संबंधित मुलाला ताब्यात घेतले जात आहे.
२६ हजार मुलांचे समुपदेशन..
निर्भया पथकाकडे मुलांनी तक्रार केल्यानंतर संबंधित मुलाला आणि त्याच्या पालकाला पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले. मुलाला समजावून सांगून त्याचे समुपदेशन करण्यात आले. पालकांनाही त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सूचना देण्यात आल्या. जिल्ह्णात तब्बल २६ हजार ४३५ जणांचे समुपदेशन करण्यात आले आहे. यातून पोलिसांना समाधानकारक प्रतिसाद मिळाला आहे.
पूर्वी जसे छेडछाडीचे गुन्हे घडत होते, तसे आता घडत नाहीत. याला केवळ निर्भया पथक कारणीभूत आहे. कारवाईसोबतच युवकांमध्ये प्रबोधनही केले जात आहे. त्यामुळे मुलींना सुरक्षितता वाटत आहे.
- राजेंद्र यादव,
पोलीस उपनिरीक्षक, निर्भया पथक सातारा