कोयनेतून उद्या ३० हजार क्यूसेकने विसर्ग होणार
By नितीन काळेल | Published: September 13, 2022 07:20 PM2022-09-13T19:20:33+5:302022-09-13T19:22:17+5:30
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला
सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास धरणात १०२ टीएमसी साठा झालेला. त्यातच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढत चालला आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून आणि दरवाजे दीड फुटांनी उचलून विसर्ग करण्यात येत आहे. तरीही धरणात आवक वाढत असल्याने बुधवारी सकाळी धरणाचे सहा दरवाजे साडे तीन फुटापर्यंत वर उचलण्यात येणार आहेत. त्यामुळे ३० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात होणार आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरु असून आज, सकाळपर्यंत कोयनेला ११६, नवजा १४२ आणि महाबळेश्वरला १२२ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणक्षेत्रात पाऊस असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे यंदा दुसऱ्यांदा उघडून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
दोन दिवसांत पावसाचा जोर वाढला असून पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळा आणि महाबळेश्वर परिसरात दमदार पाऊस पडू लागला आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजा येथे १४२ मिलीमीटर झाला. तर कोयना धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे.
सकाळच्या सुमारास धरणात १०१.५७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणात येणाºया पाण्याची आवक साडे आठ हजार क्यूसेकवर गेली होती. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारच्या सुमारास सहा दरवाजे दीड फुटाने उचलण्यात आले. त्यातून १२८९१ कुसेक तर पायथा वीजगृहातील १०५० असा एकूण १३९४१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.