३०७ मध्ये जामीनावर आहे, विसरु नको; धमकी देत लाखाची मागणी, साताऱ्यातील प्रकार
By नितीन काळेल | Published: January 19, 2024 06:30 PM2024-01-19T18:30:23+5:302024-01-19T18:32:50+5:30
सातारा : एक लाख रुपये दे नाहीतर तुला सोडणार नाही, मी ३०७ मध्ये जामीनावर आहे हे विसरु नको, सब ...
सातारा : एक लाख रुपये दे नाहीतर तुला सोडणार नाही, मी ३०७ मध्ये जामीनावर आहे हे विसरु नको, सब को मार दूंगा अशी धमकी देणाऱ्याच्या विराेधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. यातील संशयित हा कऱ्हाड तालुक्यातील आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी मुकुंद नामदेव कदम-पाटील (रा. हजारमाची, ता. कऱ्हाड) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार फिरोज सलीम खान (रा. ओगलेवाडी, ता. कऱ्हाड) याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार यातील तक्रारदार हे ओगलेवाडी येथील ओगले ग्लास वर्क्सचे संचालक आहेत. दि. १७ जानेवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास सातारा शहरातील जिल्हा परिषदेसमोर रस्त्यावर हा प्रकार घडला.
संशयिताने मी तुझ्याविरोधात ग्रामपंचायत आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे दिलेले अर्ज फुकट मागे येतात. मला एक लाख रुपये द्या असे म्हटले. यावर तक्रारदार यांनी संशयिताला खोटेनाटे अर्ज करुन मला पैसे मागू नकोस असे म्हटले. यावरुन संशयित फिरोज खान याने एक लाख रुपये द्यावेच लागतील असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. तसेच सबको मार दूंगा, खल्लास करुंगा, तुझे घरदार संपवीन, मै खानसाब हूॅं, ३०७ मध्ये जामीनावर आहे विसरु नको, अशी धमकी दिली. या प्रकारानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात मुकुंद कदम यांनी तक्रार दिली.
सातारा शहर पोलिसांनी धमकी देऊन पैशांची मागणी केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक शितोळे हे तपास करीत आहेत.