सातारा जिल्ह्यात ३१४ हेक्टरला अवकाळीचा फटका, शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे
By दीपक शिंदे | Published: March 31, 2023 02:11 PM2023-03-31T14:11:06+5:302023-03-31T14:11:27+5:30
अवकाळीतील पीक आणि फळबागा नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्याचा अहवाल समोर आला
सातारा : जिल्ह्यात १५ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळीतील पीक आणि फळबागा नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून यामध्ये माण, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यानाच फटका बसला आहे. तर या पावसामुळे १,४९७ शेतकरी बाधित झाले असून त्यांनी लवकर मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात मार्च महिन्याच्या मध्यावर अवकाळी पाऊस झाला होता. सातारा, वाई, जावळी, महाबळेश्वर, माण, खटाव आणि पाटण तालुक्यात हा पाऊस पडला. यामध्ये शेती पिके आणि फळबागांचे नुकसान झाल्याचे समोर आलेले आहे. नुकतेच अवकाळीतील पीक आणि फळबागा नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्याचा अहवाल समोर आला आहे. त्यानुसार माण, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात हे नुकसान झाले आहे.
सर्वाधिक नुकसान हे वाई तालुक्यात झाले. वाईत फळपिके सोडून बागायत पिकांखालील बाधित क्षेत्र हे २२० हेक्टर आहे. तर याचा फटका १,१९७ शेतकऱ्यांना बसला आहे. महाबळेश्वर तालुक्यात ६४ हेक्टरवरील पिके अवकाळीमुळे बाधित झाली. यामुळे २४० बळीराजांचे नुकसान झालेले आहे. तर माण तालुक्यात बागायत पिके आणि फळबागांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. १९ हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि ११ हेक्टरवरील फळबागांना फटका बसला. माण तालुक्यात एकूण अवकाळी बाधित क्षेत्र हे ३० हेक्टर असून ६० शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
अवकाळीत ८६ लाख रुपयांचे नुकसान...
अवकाळी पावसाचा फक्त तीन तालुक्यातीलच शेतीला फटका बसला. यामध्ये ८५ लाख ७३ हजार रुपयांचे पीक आणि बागांचे नुकसान झाले आहे. वाई तालुक्यात सर्वाधिक ५९ लाख ३२ हजारांचे नुकसान झाले. यानंतर महाबळेश्वर तालुक्यात १७ लाख २८ हजार तर माणमध्ये ९ लाख १४ हजारांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
संप मिटल्यानंतर पंचनामे सुरू...
जिल्ह्यातील शासकीय वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी जुनी पेन्शन योजना मागणीसाठी संपात सहभागी झाले होते. यामध्ये कृषिसेवक, ग्रामसेवक आणि तलाठी यांचाही समावेश होता. हेच कर्मचारी पीक पंचनामे करतात. संपकाळातच अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पीक नुकसानीचे पंचनामे केले नव्हते. पण, काही दिवसांनी संप मागे घेण्यात आला. त्यानंतरच अवकाळीतील नुकसानीच्या पंचनाम्याला वेग आला.