सातारकरांची चिंता वाढली, नवीन ३२ कोरोना रुग्णांची भर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 01:29 PM2023-04-07T13:29:45+5:302023-04-07T13:30:00+5:30
पहिला डोस १०० टक्के पूर्ण नाही...
सातारा : जिल्ह्यात दररोजच कोरोनाचे रुग्ण वाढत असून गुरुवारच्या अहवालानुसार तर तब्बल ३२ जण बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कोरोनाचे संकट वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण होऊ पाहत आहे. तर सध्या जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या ८२ असलीतरी १० दिवसांत १२० जणांना कोरोनाने गाठले आहे.
जिल्ह्यातील कोरोना संकटाला तीन वर्षे होऊन गेली आहेत. या तीन वर्षात आतापर्यंत दाेन लाख ८० हजार ८९३ जणांना कोरोनाने गाठले. यामध्ये जिल्ह्यातील बहुतांशी नागरिकांचा समावेश आहे. त्यातील सहा हजार ७३० लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यातील दोघांचा तर तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. या संकटाच्या आतापर्यंत दोन लाटा येऊन गेल्या. पहिलीपेक्षा दुसरी लाट मोठी ठरली; पण तिसरी लाट जिल्ह्यात आली.
मात्र, कोरोना प्रतिबंधित लसीकरण झाल्याने लाट फारकाळ टिकली नाही. आताही कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. याची तीव्रता पहिल्या दोन लाटेसारखी नाही, अशी स्थिती आहे; पण नागरिकांना काळजी घ्यावी लागणारच आहे. कारण दररोज रुग्ण वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे प्रशासन कोरोनाकडे गांभीर्याने पाहत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्याचा मागील १० दिवसांचा विचार करता १२० जणांना कोरोनाने गाठले आहे. तर दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना रुग्ण स्पष्ट होण्याचे प्रमाण कमी-जास्त होत आहे.
गुरुवारच्या अहवालानुसार ३२ रुग्ण समोर आले. हे १० दिवसांतील एकाचवेळी सापडलेली उच्चांकी रुग्णसंख्या ठरली. कारण मागील आठवड्यात दिवसांत रुग्ण सापडल्याची संख्या २, ४, ५, ७, ९, २२, २८ अशी राहिली आहे. तर जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णसंख्या ८२ इतकी झाली आहे. त्याचबरोबर नऊ जणांना उपचार करून सोडण्यात आले. सध्या ११ बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पहिला डोस १०० टक्के पूर्ण नाही...
जिल्ह्यातील १२ वर्षांवरील २५ लाख २८ हजार लोकांना कोरोना प्रतिबंधित लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यातील पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या २४ लाखांहून अधिक आहे. तर दुसरा डोस २० लाखांवर लोकांचा झालेला आहे. त्याचबरोबर १८ वर्षांवरील दाेन लाखांहून अधिक लोकांनी बूस्टर डोस घेतलाय. अजूनही जिल्ह्यात कोरोना लसीचा पहिला डोस १०० टक्के पूर्ण झालेला नाही. लोकांची उदासीनता कारणीभूत ठरली आहे.