रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच ३२ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:41 AM2021-05-07T04:41:32+5:302021-05-07T04:41:32+5:30

सातारा : जिल्ह्यातील कोरोनाच्या हाहाकाराचे राैद्ररूप समोर आले असून एप्रिल महिन्यामध्ये रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तब्बल ३२ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची ...

32 patients died before reaching the hospital | रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच ३२ रुग्णांचा मृत्यू

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच ३२ रुग्णांचा मृत्यू

Next

सातारा : जिल्ह्यातील कोरोनाच्या हाहाकाराचे राैद्ररूप समोर आले असून एप्रिल महिन्यामध्ये रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तब्बल ३२ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाने अक्राळविक्राळ रूप धारण केले असून वर्षभरात सर्वाधिक जीवितहानी एप्रिल महिन्यामध्ये झाली आहे. कोरोना बाधितांची रुग्ण संख्या वाऱ्याच्या वेगासारखी वाढली आहे. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांसाठी बेड शिल्लक उरले नाहीत. त्याचबरोबर ऑक्सिजनचे बेडही रुग्णांना मिळेनासे झाले. जो तो रुग्णालयात आपल्या नातेवाईकांसाठी बेड मिळेल का, या विवंचनेत होता. जिल्ह्यातील रुग्णालयांची अशी गंभीर परिस्थिती असल्यामुळे अनेकजण घरामध्येच तात्पुरते उपचार घेत होते. मात्र, यातून बरेच रुग्ण सहीसलामत बाहेर पडले. परंतु काही जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ३२ रुग्णांची ब्राँड डेड म्हणून नोंद करण्यात आली आहे.

अनेकजण अंगावर आजार काढत आहेत. अचानक प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयात धाव घेत आहेत. मात्र, तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. रुग्णालयात आणल्यानंतर संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर घोषित करतात. एप्रिल महिन्यामध्ये जे ३२ रुग्ण दगावले त्यांच्यावर उपचार करण्याची संधीही डॉक्टरांना मिळाली नाही. यातील काही जणांचा ऑक्सिजन अभावीही मृत्यू झाला असू शकतो. मात्र, तशी रुग्णालयात नोंद नाही.

जिल्ह्यात गतवर्षी ज्यावेळी कोरोनाने हाहाकार माजवला होता. त्यावेळी सुद्धा अशी परिस्थिती उद्भवली नव्हती. एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये त्यावेळी १३ रुग्णांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. परंतु यंदाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. केवळ एप्रिल महिन्यामध्ये ३२ रुग्णांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासन हादरले आहे. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या रोखण्यासाठी प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. मात्र, अद्यापही अनेक लोकांनी पहिला डोस घेतला नाही, असे अनेक लोक आहेत. त्यामुळे अत्यंत वेगाने लसीकरण झाले तर हा ब्राँड डेडचा आकडाही कमी होऊ शकतो, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

चौकट: जिल्ह्यात ६२४ जणांचा मृत्यू

कोरोनाची महामारी एप्रिल महिन्यात बळावली गेली. अनेक लोक बाधित आढळून आले तर अनेकांचा बळी गेला. केवळ एप्रिल महिन्यामध्ये तब्बल ६२४ लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. इतकी भयानक अवस्था एप्रिल महिन्यात झाली आहे.

कोट

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढलेला असून नागरिकांनी थोडी जरी लक्षणे आढळली तर डॉक्टरांकडे जाऊन चाचणी करावी. आजार अंगावर काढू नये. अनेकजण जुने पारंपरिक औषधोपचार घेत आहेत. अशावेळी मग रुग्ण गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात येतो. त्यावेळी मग डॉक्टरांचाही नाईलाज होतो. त्यामुळे नागरिकांनी अंगावर आजार न काढता तत्काळ रुग्णालयात दाखल व्हावे.

डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

Web Title: 32 patients died before reaching the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.