सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघोबांचा संसार, कर्नाटकात १७, गोव्यात ५ वाघ; ‘डब्ल्यूसीटी’चा अहवाल 

By संजय पाटील | Published: August 10, 2024 01:31 PM2024-08-10T13:31:45+5:302024-08-10T13:32:23+5:30

महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात ३२ वाघांचा वावर असल्याची माहिती या अहवालातून समोर आली, सह्याद्री प्रकल्पात मादी वाघ पिढ्यान्पिढ्या प्रजनन करीत असल्याची नोंदही अहवालात करण्यात आली आहे.

32 tigers live in the Sahyadri-Kokan corridor, 17 in Karnataka, 5 in Goa; Report of 'WCT'  | सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघोबांचा संसार, कर्नाटकात १७, गोव्यात ५ वाघ; ‘डब्ल्यूसीटी’चा अहवाल 

सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघोबांचा संसार, कर्नाटकात १७, गोव्यात ५ वाघ; ‘डब्ल्यूसीटी’चा अहवाल 

कऱ्हाड (जि. सातारा) : सह्याद्रीला केंद्रस्थानी ठेवून ‘वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’ने (डब्लूसीटी) कोल्हापूर वन विभाग आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या मदतीने तयार केलेला अहवाल कऱ्हाडमध्ये पार पडलेल्या सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला. महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात ३२ वाघांचा वावर असल्याची माहिती या अहवालातून समोर आली, सह्याद्री प्रकल्पात मादी वाघ पिढ्यान्पिढ्या प्रजनन करीत असल्याची नोंदही अहवालात करण्यात आली आहे.

प. महाराष्ट्रातील दहा वाघांच्या छायाचित्रांची नोंद
अहवालानुसार गोवा व कर्नाटक राज्यातील वाघांची संख्या ही राष्ट्रीय व्याघ्र गणनेच्या अहवालामधून घेण्यात आल्याची माहिती ‘डब्लूसीटी’चे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांनी परिषदेत दिली. कर्नाटकमधील १७ आणि गोव्यातील ५ वाघांची संख्या ही राष्ट्रीय व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार नोंदवण्यात आली, तर पश्चिम महाराष्ट्रामधील दहा वाघांच्या छायाचित्रांची नोंद संशोधकांनी त्यांच्या अभ्यासातून केली आहे.

महत्त्वाचा भ्रमणमार्ग
सह्याद्री-कोकण भ्रमणमार्ग प्रदेशामध्ये मादी वाघ पिढ्यान् पिढ्या प्रजनन करत आहे.
२०१५ साली या ठिकाणी जन्मास आलेल्या एका मादी वाघिणीने तीन पिलांना जन्म दिला आहे.
मे, २०१८ रोजी सह्याद्री प्रकल्पामधील चांदोली अभयारण्यात आढळलेला टी-३१ हा नर वाघ मे २०२० साली कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पात आढळला होता.
२०१८ मध्ये महाराष्ट्रात टिपण्यात आलेली टीटी ७ नामक वाघीण जवळपास चार वर्षांनंतर ३० जून २०२१ रोजी गोव्यातील म्हादई अभयारण्यात आढळली होती.

सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गातील वाघांच्या संचाराविषयी कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली. राज्यांतर्गत होणाऱ्या वाघांच्या हालचालींबाबत समन्वय साधण्यासाठी लवकरच वन अधिकाऱ्यांचा गट तयार करण्यात येणार आहे. 
- मणिकंदन रामानुजम, मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर (प्रादेशिक)

असा आहे भ्रमणमार्ग 
सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गाचा विस्तार १० हजार ७८५ चौरस किलोमीटर आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून दक्षिणेकडे कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत तो पसरला आहे.
 

Web Title: 32 tigers live in the Sahyadri-Kokan corridor, 17 in Karnataka, 5 in Goa; Report of 'WCT' 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.