सैन्यभरतीच्या आमिषाने सातारा जिल्ह्यातील युवकांची ३४ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 12:02 PM2024-07-11T12:02:21+5:302024-07-11T12:03:09+5:30
युवकांचा बेमुदत उपोषणाचा इशारा
सातारा : भारतीय सैन्यदल व भारतीय रेल्वे डीआरडीओ बीएमसी आदी ठिकाणी कामाला लावतो, या आमिषाने सातारा जिल्ह्यातील शंभराहून अधिक युवकांची फसवणूक झाली आहे. काही युवकांची तब्बल ३४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती कुडाळ तालुका जावळी येथील राजेंद्र दिलीप भिलारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भिलारे यांनी म्हणाले की, हृषिकेश शंकर फाळके, राजेंद्र कालीदास देवकर, तानाजी शंकर देवकर, महेंद्र गजानन शेवते, रवींद्र बाळकृष्ण चव्हाण व चैतन्य तात्यासोा तुपे या तरुणांची झालेली फसवणूक प्राथमिक स्वरूपाची आहे. सातारा जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर व पुणे येथीलही शेकडो तरुणांना नोकरीच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा घालण्यात आलेला आहे वरील सहा तरुणांची ३४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
भिलारे पुढे म्हणाले, राजेंद्र दिनकर सपकाळ रा. नांदगिरी (धुमाळवाडी) ता. कोरेगाव यानेही फसवणूक केली असून डीआरडीओ, बीएमसी, भारतीय लष्कर, भारतीय रेल्वे येथे कामाला लावतो असे सांगून त्या मुलांचा विश्वास संपादन केला. काही मुलांची कामे केल्याचे भासवून त्यांना कॉल लेटर मोबाईलमध्ये दाखवले. काही मुलांनी त्याला पन्नास हजार रुपये अनामत रक्कम देऊन उरलेली रक्कम वाराणसी येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर देण्याचे कबूल करण्यात आले.
राजेंद्र सपकाळ यांची पत्नी संध्याराणी सपकाळ यांच्या अकौंटला काही मुलांनी रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली आहे. हे तरुण या सर्व गोष्टींना साक्षीदार आहेत. गेली पाच वर्षे सपकाळ या माणसाला आम्ही वारंवार फोन करून पैसे मागत असताना तो टाळाटाळींची उत्तरे देत आहे तसेच जीवे मारण्याची धमकी देत आहे. पोलिस व प्रशासन कोणी माझे वाकडे करून शकत नाही. माझी खूप मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख आहे. त्यामुळे तुम्ही माझे काही करू शकत नाही, अशी धमकी राजेंद्र सपकाळ देत असल्याचा आरोप तरुणांनी केला आहे.
युवकांचा बेमुदत उपोषणाचा इशारा
पोलिसांकडे या प्रकरणाची वारंवार तक्रार करूनही त्यांची दखल घेतली जात नाही. आम्ही पैसे घेण्यासाठी घरी गेलो असता सध्या संध्याराणी सपकाळ शिवीगाळ व वाईट वर्तन करत असून पोलिसात तक्रार करण्याची, अशा धमकी देत आहेत. यासंदर्भात आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही सर्व पीडित तरुण जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.