महाबळेश्वरला ३४ मिलिमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:24 AM2021-07-05T04:24:43+5:302021-07-05T04:24:43+5:30

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक ठिकाणी पाऊस होत असून रविवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ३४ मिलिमीटर पाऊस झाला. तर ...

34 mm rain to Mahabaleshwar | महाबळेश्वरला ३४ मिलिमीटर पाऊस

महाबळेश्वरला ३४ मिलिमीटर पाऊस

Next

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक ठिकाणी पाऊस होत असून रविवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ३४ मिलिमीटर पाऊस झाला. तर कोयना व नवजा भागात उघडीप होती. त्याचबरोबर पूर्व भागात अजूनही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात मागील २० दिवसांपूर्वी दमदार हजेरी लावलेल्या पावसाने सध्या दडी मारली आहे. त्यामुळे अनेक भागात खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहे, तर पश्चिम भागातही तुरळक स्वरुपात पाऊस होत आहे. त्यामुळे धरणातही पाण्याची आवक कमी होताना दिसून येत आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे अवघा १ मिलिमीटर पाऊस पडला. तर जूनपासून ९२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला २ तर या वर्षी आतापर्यंत १०९१ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. महाबळेश्वरला सकाळपर्यंत ३४ तर जूनपासून १२८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

रविवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४२.२२ टीएमसी एवढा पाणीसाठा होता, तर २८४२ क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत होती. धरणाच्या पायथा वीजगृहातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. दरम्यान, सातारा शहराबरोबरच पूर्व भागात ढगाळ वातावरण कायम आहे.

पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची कामे उरकण्यास सुरुवात केली आहे. पण, भात लागणीसाठी पावसाची आवश्यकता आहे. पूर्व भागात अनेक शेतकऱ्यांनी थोड्या ओलीवर खरीपची पेरणी केली. पण, पीकवाढीसाठी पाऊस आवश्यक आहे. तसेच काही शेतकरी पावसावर विसंबून असल्याने पेरणी रखडली आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास पेरणी होऊ शकते.

.......................................................

Web Title: 34 mm rain to Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.