साताऱ्यातील डाॅक्टरची ३५ लाखांची फसवणूक, संशयित आरोपी नागपूर जेलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 08:25 PM2022-12-07T20:25:04+5:302022-12-07T20:25:11+5:30
सीटी स्कॅन मशीनसाठी कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून फसवले.
सातारा: सीटी स्कॅन मशीनसाठी कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून साताऱ्यातील एका प्रसिद्ध डाॅक्टरची तब्बल ३५ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ज्याने डाॅक्टरांची फसवणूक केली तो संशयित आरोपी सध्या नागपूर कारागृहात असून, त्याने अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
मनीष अशोक अग्रवाल (वय १९, रा. प्रतीक नगर पुणे, मूळ रा. कोलकत्ता) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील एका प्रसिद्ध डाॅक्टरांना सीटी स्कॅन मशीन खरेदी करायची होती. यासाठी त्यांनी पुण्यातील एका बँकेत कर्जप्रकरण केले होते. त्यावेळी तेथे मनीष अग्रवाल हा एजंट म्हणून काम करत होता.
अग्रवाल याने संबंधित डाॅक्टरांकडून विविध कारणे सांगून पैसे उकळण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या प्रोसेसिंग फी म्हणून तो पैसे उकळू लागला. एवढेच नव्हे तर वर्षभरापूर्वी तो कोलकात्याला कुटुंबासह गेला होता. त्यावेळी त्याला पुण्यात विमानाने येण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्याने डाॅक्टरांना ६९ हजारांचे विमानाचे तिकीट काढण्यास सांगितले. डाॅक्टरांनीही लवकर कर्ज मंजूर होईल, या आशेने त्याचे विमानाचे तिकीट काढले. मात्र, तरीही त्याची पैशाची भूक काही कमी होत नव्हती.
वर्षभरात डाॅक्टरांनी मनीष अग्रवाल याला तब्बल ३५ लाख २ हजार ६७० रुपये दिले. दरम्यान, अग्रवाल याने अशाच प्रकारे अन्य काही लोकांना फसविल्याचे समोर आले. त्याच्याविरोधात तक्रारींचा ओघ सुरू झाला. नागपूर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली. सध्या तो नागपूरच्या कारागृहात आहे. त्याने अनेकांना फसविल्याचे साताऱ्यातील डाॅक्टरांनाही समजल्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे हे अधिक तपास करीत आहेत.
सातारा पोलिस घेणार ताबा
नागपूर कारागृहात असलेला मनीष अग्रवाल याचा ताबा आता सातारा पोलिस घेणार आहेत. त्याने सातारा जिल्ह्यात अशा प्रकारे आणखी कोणाला फसविले आहे का, याची पोलिस चाैकशी करणार आहेत.