वनराई बंधारे निर्मिती; सातारा जिल्ह्यात पहिल्या दिवशी ३५५ बंधारे बांधून पूर्ण
By नितीन काळेल | Published: November 29, 2023 07:21 PM2023-11-29T19:21:44+5:302023-11-29T19:21:56+5:30
गावागावांत वेग येणार अन् पाणी अडणार
सातारा : यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने राज्यात दुष्काळी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचे महत्व लक्षात घेऊन मृद व जल, पाणलोट क्षेत्र कृषी आयुक्तालयाच्या वतीने ‘एक दिवस वनराई बंधाऱ्यासाठी’ संकल्पना २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. पहिल्या दिवशी लोकसहभागातून ३५५ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. यातील १२८ पाटणमधील आहेत. तर एकूण २८५० बंधारे बांधण्यात येणार असून गुरुवारी याला वेग येणार आहे.
पाणी हे पिण्यासाठी आवश्यक असते. तसेच शेतीसाठीही लागते. कारखानदारी असो किंवा अन्य क्षेत्र यासाठी कमी-अधिक फरकाने पाणी हे लागतेच. पण, एखाद्यावर्षी पाऊस कमी झाला तर त्याचे भयावह परिणामही दिसून येतात. आताही तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण, राज्यात यावर्षी पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. राज्य शासनाने उपाययोजनेचा एक भाग म्हणून ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केलेला आहे. तर त्यानंतर अनेक महसूल मंडलातही दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. पाऊस नसल्यानेच अशी स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे पाण्याचे महत्व लक्षात येते.
या अनुषंगानेच राज्य शासनाच्या मृद, जल संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषी आयुक्तालयाच्या वतीने लोकसहभागातून वनराई बंधारे घेण्याची सूचना करण्यात आलेली आहे. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत आणि कृषी विभागानेही तयारी केलेली आहे. ग्रामविकास विभागासाठी प्रती गाव पाच वनराई बंधारे निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात २ हजार ८५० वनराई बंधारे निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवून ते पूर्णही करण्यात येणार आहेत.
यासाठी दि. २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी ही संकल्पना जिल्ह्यात राबविली जात आहे. पहिल्या दिवशी बुधवारी ३५५ वनराई बंधारे बांधून पूर्ण झालेले आहेत. तसेच पाणी अडलेही आहे. आता गुरुवारीही गावागावात ही मोहीम राबविली जाणार आहे. यातून मोठ्या प्रमाणात वनराई बंधाऱ्यांची निर्मिती होणार आहे. तसेच अडलेल्या पाण्याचा फायदा शेतीसाठी होणार हे निश्चित आहे.
अवकाळीचे पाणी अडण्याचे काम होणार..
या मोहिमेत गावातील सर्व ग्रामस्थांचा सहभाग राहत आहे. तसेच जिल्हा परिषद, हायस्कूल, खासगी शाळा आणि महाविद्यालयातील विद्याऱ्थी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, खासगी कंपनी, सहकारी संस्था, कारखाने आदींचा सहभाग घेऊन वनराई बंधारे बांधले जात आहेत. यामुळे सध्या अनेक ठिकाणी ओढ्यांना पाणी नाही. पण, अवकाळी पाऊस चांगला झाल्यास पाणी अडवणूक होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच या बंधाऱ्यामुळे भविष्यातही पाणी साठून राहण्याने भूगर्भातील पाण्याची पातळीही वाढणार आहे. वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणी अडविणे आणि त्याचा फायदा करुन घेणे अशीच ही संकल्पना आहे.
जिल्ह्यात ‘एक दिवस वनराई बंधारे कामासाठी’ ही संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखली राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून जिल्ह्यात २८५० वनराई बंधारे बांधले जाणार आहेत. हे बंधारे ओढ्यावर बांधले जाणार असल्याने अवकाळीचा पाऊस झाल्यास वाहून जाणारे पाणी अडले जाणार आहे. यामुळे जमिनीतील पाणीपातळीही वाढणार आहे. यामध्ये ग्रामस्थ, संस्थाचा सहभाग घेऊन संकल्पना यशस्वी करण्यात येईल. - विजय माईनकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी
वनराई बंधारे निर्मिती..
तालुका - पूर्ण कामे
जावळी ०५
कऱ्हाड ४६
खंडाळा ०६
खटाव ०७
कोरेगाव १०
महाबळेश्वर ८३
माण ०५
पाटण १२८
फलटण २०
सातारा ३६
वाई ०९