तब्बल ३५६ मशालींनी उजळला प्रतापगड...
By admin | Published: October 6, 2016 12:38 AM2016-10-06T00:38:40+5:302016-10-06T01:13:26+5:30
धुके असूनही मावळे जिद्दीला : मशाली पेटविताना गडावरील तोफांची सलामी
वाडाकुंभरोशी : मराठ्यांच्या देदीप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असणारा प्रतापगड किल्ला बुधवारी ३५६ मशालींनी उजळून निघाला. गडावर भवानी मातेच्या मंदिराला ३५६ वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवरात्रोत्सव, चतुर्थी दिवशी येथे मशाली पेटविल्या जाऊ लागल्या. गेली पाच वर्षे ही परंपरा सुरू असून, यंदा उत्सवाचे सहावे वर्ष आहे. बुधवारी गडावर प्रचंड धुके असतानाही मोठ्या जिद्दीने मावळ्यांनी या साऱ्या मशाली पेटविल्या. तसेच तोफांची सलामी देण्यात आली.
सह्याद्रीच्या उत्तुंग गिरी शिखरावर वसलेला प्रतापगड किल्ला किती तरी ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी केलेले कित्येक पराक्रम या किल्ल्याशी जोडलेले आहेत. महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीमध्ये सापडणाऱ्या शाळीग्राम दगडापासून भवानी मातेची मूर्ती बनवून गडावर तिची स्थापना केली. या घटनेला ३५६ वर्षे पूर्ण झाल्यानंतर गडावर ३५६ मशाली पेटविण्यात आल्या. यानंतर गेली पाच वर्षे नवरात्रोत्सव, चतुर्थी दिवशी मशाली पेटविण्याची परंपरा सुरू झाली. यंदा या परंपरेचे सहावे वर्ष असून, बुधवारी ३५६ मशालींनी किल्ला उजळून निघाला. हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांसह नागरिकांनी गर्दी केली होती. रात्री उशिरार्यंत हा सोहळा सुरू होता. (प्रतिनिधी)