वधू-वराकडून शासनाला ३६ हजारांचा ‘आहेर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:37 AM2021-03-06T04:37:38+5:302021-03-06T04:37:38+5:30
सातारा : शहरात शुक्रवारी पार पडलेला एक लग्न सोहळा वधू-वर पक्षासह मंगल कार्यालय चालकाला भलताच महागात पडला. सोशल डिस्टन्सचे ...
सातारा : शहरात शुक्रवारी पार पडलेला एक लग्न सोहळा वधू-वर पक्षासह मंगल कार्यालय चालकाला भलताच महागात पडला. सोशल डिस्टन्सचे उल्लंघन, क्षमतेपेक्षा जास्त वऱ्हाडींची हजेरी व मास्क न वापरणाऱ्यांवर पालिकेच्या पथकाने कारवाई करून तब्बल ३६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.
राज्यासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यात सरासरी ३० ते ४० रुग्ण जिल्ह्यात आढळून आले होते. हा आकडा आता १५० ते २०० च्या घरात पोहोचल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुन्हा एकदा नियमावली जाहीर केली असून, सण, उत्सव, लग्न सोहळ्यात नागरिकांची उपस्थिती, बाजारपेठेची वेळ आदींवर निर्बंध घातले आहेत. लग्न सोहळ्याला पूर्वी वधू-वर पक्षाकडील शंभर नागरिकांना परवानगी होती. ही संख्या आता पन्नास इतकी मर्यादित केली आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत.
साताऱ्यातील सदर बझार येथे शुक्रवारी दुपारी एक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी वधू-वर पक्षाकडील पन्नासहून अधिक सदस्यांनी हजेरी लावल्याची माहिती कोरोना विभागप्रमुख प्रणव पवार यांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाहणीत मंगल कार्यालयात क्षमतेपेक्षा अधिक नागरिक दिसून आले. शिवाय सोशल डिस्टन्सचे उल्लंघनही करण्यात आले. त्यामुळे प्रणव पवार यांनी लग्न सोहळ्याच्या आयोजकांवर १० हजार व मंगल कार्यालय चालकावर २५ हजार रुपये दंडात्मक कारवाई करून दंडही वसूल केला. या सोहळ्यात विनामास्क वावरणाऱ्या तीन नागरिकांवर कारवाई करून संबंधितांकडून प्रति पाचशे असा दीड हजारांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर सातारा शहरात मंगल कार्यालयावर झालेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
फोटो : ०५ सातारा मंगल कार्यालय