अक्षम्य चुकांसाठी मोजले ३७ लाख !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:49 AM2021-06-16T04:49:59+5:302021-06-16T04:49:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाकाळात सातारकरांनी केलेल्या अक्षम्य चुका पालिकेच्याच पथ्यावर पडल्या आहेत. कारण गेल्या चौदा महिन्यांत पालिका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाकाळात सातारकरांनी केलेल्या अक्षम्य चुका पालिकेच्याच पथ्यावर पडल्या आहेत. कारण गेल्या चौदा महिन्यांत पालिका व पोलीस प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८ हजार १७४ जणांवर कारवाई केली असून, तब्बल ३७ लाख ४२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. दंडाची ही रक्कम कोरोना प्रतिबंधासाठी उपयोगात आणली आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २३ मार्च २०२० रोजी आढळून आला. यानंतर कोरोनाचे संक्रमण हळूहळू वाढत गेले. बाधितांचा आकडा वाढत असताना जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढली. कोरोनाची ही लाट थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी लागू करतानाच बाजारपेठ, उद्योग-व्यवसाय तसेच नागरिकांवर निर्बंध घालण्यात आले. नागरिक, दुकानदारांना मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करण्यात आले. दुकानदारांना वेळचे बंधन घालण्यात आले. जिल्ह्याच्या सीमा बंद असताना ई-पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेशही दिला जात नव्हता. हे निर्बंध घालतानाच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेशही जिल्हा प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आले.
असे असताना सातारकरांनी मात्र ही बाब काही गांभीर्याने घेतली नाही. दि. १ एप्रिल २०२० ते ९ जून २०२१ या चौदा महिन्यांच्या कालावधीत पालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ८ हजार १७४ नागरिक व दुकानदारांवर कारवाई केली आहे. इतकेच नव्हे तर संबंधितांकडून दंडापोटी तब्बल ३७ लाख ४२ हजार ४०० इतकी रक्कमही वसूल केली आहे. कोरोनाकाळात पालिकेची आर्थिक घडी विस्कटली असताना दंडाच्या माध्यमातून का होईना पालिकेला मोठा दिलासा मिळाला. पालिकेकडून कोरोना प्रतिबंधाच्या कामात ही रक्कम खर्च करण्यात आली आहे.
(चौकट)
कोरोना प्रतिबंधावर खर्च
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर संबंधित परिसर सील करणे, मृतदेहांवर अंत्यसंस्कार, शहरासह प्रतिबंधित क्षेत्रात धूर व औषधफवारणी करणे, स्वच्छता करणे आदी कामे पालिकेकडून केली जात आहे. दंडाच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम पालिकेकडून याकामी वापरण्यात आली आहे.
(चौकट)
नागरिकांनो, थोडा निर्धास्तपणा सोडा !
पालिका व पोलीस प्रशासनाने चौदा महिन्यांत मास्क न घालणाऱ्या तब्बल ७ हजार ६१ नागरिकांवर कारवाई केली आहे. या नागरिकांकडून सर्वाधिक २४ लाख १८ हजार ८०० रुपये दंड वसूल केला आहे. कोरोना प्रतिबंधासाठी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. असे असताना सातारकरांचा निर्धास्तपणा अजूनही कमी झालेला नाही. मास्क न घालणाऱ्यांनो थोडा निर्धास्तपणा सोडा, असं म्हणण्याची वेळ आता आली आहे.
(पार्इंटर)
१४ महिन्यांचा लेखाजोखा
---------------
१. विनामास्क
७०६१ कारवाया
२४ लाख १८ हजार ८०० रुपये दंड
---------
२. सोशल डिस्टन्सचे उल्लंघन, कार्यक्रमांना गर्दी
४३६ कारवाया
७ लाख ९७ हजार दंड
---------
३. दुकानात जास्त ग्राहक, उशिरापर्यंत दुकाने सुरू
६६८ कारवाया
५ लाख १८ हजार १०० रुपये दंड
---------
४. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
२ कारवाया
२ हजार रुपये दंड
----------
५. ई पास न घेता शहरात येणे
७ कारवाया
६ हजार ५०० दंड
फोटो :