भीतीमुळे ३८ कुटुंबांनी रात्र काढली जागून -इमारतीचा भराव खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 08:45 PM2017-09-22T20:45:30+5:302017-09-22T20:45:30+5:30
सातारा : ‘जेवण अन् गप्पा-गोष्टी करून आमचे नुकतेच डोळे लागत होते, तोवर ‘धडाम’ असा आवाज झाला आणि आमची झोपचं उडाली.
सातारा : ‘जेवण अन् गप्पा-गोष्टी करून आमचे नुकतेच डोळे लागत होते, तोवर ‘धडाम’ असा आवाज झाला आणि आमची झोपचं उडाली. मध्यरात्री अपार्टमेंटमध्ये राहणारे सर्वजण बाहेर आले आणि आवाजाच्या दिशेने पळू लागले. पार्किंगमध्ये आल्यानंतर समोरील दृश्य पाहून सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडाला. पार्किंगचा संपूर्ण भराव ओढ्यात कोसळला होता. तर इमारतीचे पिलर उघडे पडले होते. मात्र, सुदैवाने इमारतीला कसलाही धोका पोहोचला नाही.’ परंतु, खबरदारी म्हणून या इमारतीमधील ३८ कुटुंबांना रात्र जागून काढावी लागली.पंताचा गोट येथे भटजी महाराज मठाजवळ दीपलक्ष्मी अपार्टमेंट आहे. २००७ साली या अपार्टमेंटचे बांधकाम पूर्ण झाले. तर २००८ रोजी कुटुंबीयांना याचा ताबा देण्यात आला. यामध्ये एकूण ३८ कुटुंबे सध्या वास्तव्य करीत आहेत. गुरुवारी रात्री येथील बहुतांश नागरिक नेहमीप्रमाणे जेवण केल्यानंतर झोपी गेले. डोळा लागतो न लागतो तोच रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास काहीतरी कोसळण्याचा आवाज झाला. आवाज ऐकून गोंधळ उडाल्याने सर्व कुटुंबे जागी झाली अन् जो-तो इमारतीमधून पळतच खाली येऊ लागले.
पार्किंगमधील दृश्य पाहून सर्वांच्या काळजाचा थरकाप उडाला. २०० फूट लांब व सुमारे २५ फूूट उंच संरक्षक भिंतीसह इमारतीचा संपूर्ण भराव इमारतीच्या खालून वाहणाºया नैसर्गिक ओढ्यात कोसळला होता. हे भयानक चित्र पाहून येथील रहिवाशांची झोपच उडाली. इमारतीला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने सर्वजण इमारतीपासून दूरवर गेले. तर काहीजणांनी शेजाºयांकडे आसरा घेतला.
या भरावात सेफ्टी टॅँक व पाण्याची टाकीही कोसळली. तर पार्किंगमधील दोन दुचाकीही मातीच्या ढिगाºयासह ओढ्यात कोसळल्या.
या घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यासह नगरसेवक तसेच पोलिसांनी मध्यरात्री दोन वाजता घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. रहिवाशांनी घाबरून न जाता धोकादायक ठिकाणी कोणीही येऊ नये, अशा सूचना करून संबंधित ठेकेदाराला पालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात येईल, अशी ग्वाही गोरे यांनी दिली.