ऊसतोड टोळ्यांकडून ३९ कोटींची फसवणूक, राज्यातील ८१ कारखान्यांची फसवणूक झाल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 11:13 AM2022-08-18T11:13:18+5:302022-08-18T11:13:38+5:30

कामगार व तत्सम यंत्रणा एकाच हंगामात एकापेक्षा अनेक कारखान्यांशी करार करून फसवणूक करतात

39 crore fraud by sugarcane gangs, It is revealed that 81 factories in the state have been cheated | ऊसतोड टोळ्यांकडून ३९ कोटींची फसवणूक, राज्यातील ८१ कारखान्यांची फसवणूक झाल्याचे उघड

ऊसतोड टोळ्यांकडून ३९ कोटींची फसवणूक, राज्यातील ८१ कारखान्यांची फसवणूक झाल्याचे उघड

googlenewsNext

पिंपोडे बुद्रुक : सन २००४ पासून २०२० पर्यंत राज्यातील ८१ साखर कारखान्यांची ऊसतोड कामगार व तत्सम व्यवस्थेकडून सुमारे ३९ कोटी ४६ लाख ८४ हजार ३२२ रुपयांइतकी फसवणूक झाल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
  
राज्यात एकाचवेळी सुमारे दोनशे कारखाने सुरू होतात. कारखाना हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखाने कामगार, वाहतूकदार यांच्याशी करार करतात. परंतु कामगार व तत्सम यंत्रणा एकाच हंगामात एकापेक्षा अनेक कारखान्यांशी करार करून फसवणूक करतात. यासाठी साखर आयुक्तालयाने विकसित केलेल्या महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार या ॲपद्वारे सन २००४ ते २०२० पर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार ऊस कामगार व तत्सम यंत्रणेकडून कारखान्यांची एकूण ३९ कोटी ४६ लाख ८४ हजार ३२२ रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

साखर कारखान्यांची वाहतूकदार, मुकादम, ऊसतोडणी कामगारांकडून फसवणूक होऊ नये म्हणून या ॲपद्वारे गेली दोन वर्षे माहिती संकलित करण्यात आली आहे. ॲपमुळे एकूणच ऊस तोडणीच्या व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

राज्यातील ऊस तोडणी कामगार यंत्रणा

ऊसतोडणी कामगार - १० लाख
वाहनमालक - ५५ हजार
मुकादम - ५० हजार

२०२०-२०२१ करिताच्या नोंदीत माहिती पाहता ३८ हजार ९६७ वाहनधारक, २ हजार ४० मुकादम यांनी माहिती भरली आहे. तसेच ४ हजार १५३ लोकांनी ॲपचा वापर केला असून, ही संख्या चालूवर्षी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. दरवर्षी ऊसतोडणीसाठी साखर कारखाने मुकादम आणि ऊस तोडणी टोळी प्रमुखांना गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी उचल रक्कम देतात. प्रत्यक्षात रक्कम घेऊनही तोडणीस टोळ्यांचा पुरवठा न होण्यामुळे कारखाने पोलिसांमध्ये गुन्हेही दाखल करीत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.


ऊस तोडणी तसेच गाळप प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी साखर आयुक्तालय विशेष परिश्रम घेत आहे. त्यासाठी ॲपद्वारे ऊस नोंद, महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार यांसारखे ॲप विकसित करून माहिती संकलन करून शेतकरी, ऊस तोड कामगार, वाहतूकदार, कारखानदार यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु अजूनही काही लोकांकडून वा यंत्रणांकडून जाणूनबुजून खरी माहिती लपवली जात आहे. त्यामुळे अशा प्रक्रारची फसवणूक प्रकरणे होत आहेत. सर्व यंत्रणांनी तसेच कारखान्यांनी खरी माहिती भरल्यास संभाव्य फसवणूक टाळता येणे शक्य आहे. - शेखर गायकवाड, साखर आयुक्त

Web Title: 39 crore fraud by sugarcane gangs, It is revealed that 81 factories in the state have been cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.