ऊस कामगार पुरविण्याच्या आमिषाने शेतकऱ्याची ३९ लाखांची फसवणूक; नंदुरबारमधील दोघांवर गुन्हा
By दत्ता यादव | Published: February 28, 2024 08:11 PM2024-02-28T20:11:36+5:302024-02-28T20:11:56+5:30
याप्रकरणी नंदुरबार येथील दोघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : ऊसतोड कामगार पुरवितो म्हणून करार केला. त्यानंतर वेळोवेळी ३९ लाख रुपये घेतले; मात्र पैसेही परत केले नाहीत आणि कामगारही पुरविले नाहीत, अशा प्रकारे जिहे येथील शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी नंदुरबार येथील दोघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुरेश फत्तू वळवी (वय ३४, रा. काेळदे, ता. नंदुरबार), जयसिंग भीमा पवार (३१, रा. पातोंडा, जि. नंदुरबार), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत निखिल चंद्रहास जाधव (३१, रा. जिहे, ता. सातारा) या तरुण शेतकऱ्याने तक्रार दिली आहे. हा फसवणुकीचा प्रकार मे २०२२ ते जानेवारी २०२४ या कालावधीत घडला आहे. शेतकरी निखिल जाधव यांना गळीत हंगामासाठी ऊसतोड कामगार पाहिजे होते. यासाठी ते वळवी व पवार यांना भेटले.
या दोघांनी ऊसतोड मजूर देतो, असे सांगितले. त्यानंतर या व्यवहाराचा लेखी करारनामासुद्धा झाला. ‘ऊसतोड कामगार लवकरच पुरवतो,’ असे सांगून नंदुरबारच्या दोघांनी निखिल जाधव यांच्याकडून वेळोवेळी ३९ लाख रुपये घेतले. मात्र, ऊसतोड कामगार पुरविले नाहीत, तसेच पैसेही परत दिले नाहीत. संबंधित दोघांशी जाधव यांनी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली. त्यानंतर संपर्क बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गुरव हे करीत आहेत.