हृदयद्रावक! २ मुलांचं पितृछत्र हरपलं; सातारच्या ३९ वर्षीय जवानाला 'वीरमरण', कोरेगाव तालुक्यावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 12:28 PM2023-04-25T12:28:29+5:302023-04-25T12:28:37+5:30
vijay jadhav news : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील ३९ वर्षीय जवान भारतमातेसाठी शहीद झाला आहे.
vijay jadhav indian army । सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील ३९ वर्षीय जवान भारतमातेसाठी शहीद झाला आहे. विजय पांडुरंग जाधव असे शहीद वीरपुत्राचे नाव असून त्यांचे काल सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पुणे येथे कॉलेज ऑफ मिलिट्री येथे प्रशिक्षण घेत असताना त्यांना धावताना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या पश्चात २ मुले, पत्नी, आई, वडील, भाऊ आणि पुतण्या असा परिवार आहे.
दरम्यान, ३९ वर्षीय जवान शहीद झाल्याने कोरेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. कोरेगावातील चिमणगाव या त्यांच्या मूळ गावी जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते २३ ऑगस्ट २००१ मध्ये शिपाई म्हणून सातारा पोलीस दलात भरती झाले होते. त्यानंतर त्यांनी पुण्यातील बॉम्बे इंजिनिअरिंग येथे प्रशिक्षण घेतले. नंतर जाधव यांची पटियाला येथे नेमणूक झाली. अमृतसर, झाशी, श्रीनगर आणि पुणे येथे त्यांनी नाईक आणि हवालदार या पदांवर काम केले आहे.
३९ वर्षीय जवान शहीद
विजय जाधव हे भारतीय सैन्य दलातील ११४ बॉम्बे इंजिनिअर ग्रुप मध्ये गेली २१ वर्षे कार्यरत होते. सध्या झाशी या ठिकाणी देशसेवा बजावत असणारे जाधव यांचा पुण्यात प्रशिक्षणादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर आज काळेश्वर हायस्कूल मैदान या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"