वीज कोसळून सातारा जिल्ह्यात वर्षभरात 'इतक्या' जणांचा गेला जीव, संरक्षणासाठी 'अशी' घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 12:26 PM2022-10-12T12:26:00+5:302022-10-12T12:55:17+5:30
शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात वीज कोसळून गेल्या वर्षभरात चार जणांचा मृत्यू झाला. याशिवाय ६ जनावरे मृत्युमुखी पडली. वळीव, मान्सून पूर्व, तसेच परतीच्या पावसाच्या वेळी विजांचा कडकडाट होतो. मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकरी आडोशाला थांबलेले असतात. मात्र, वीज कोसळून दुर्घटना होण्याचा धोका असतो. दरवर्षी वीज कोसळून दुर्घटना घडत असतात. यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
वीज पडून जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात वीज कोसळून चार जणांचा बळी गेला आहे. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख अशी सोळा लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. शासनाने मदत दिली असली, तरी घरचा कर्ता पुरुष कुटुंबाने गमावला आहे. यामुळे विजा कोसळत असताना सुरक्षित ठिकाणी घरी अथवा इमारतीत थांबावे.
सहा जनावरे दगावली
वर्षभरात वीज कोसळल्याने ६ जनावरे दगावली आहेत. अनेकदा शेतकरी गुरांना झाडाला बांधत असतात. वीज झाडावर कोसळण्याची शक्यता असते. यामुळे शेतकऱ्यांनी गुरांना इतर सुरक्षित ठिकाणी बांधावे.
चार जणांच्या वारसांना मिळाले प्रत्येकी चार लाख
गतवर्षात जिल्ह्यात चार जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख मदत शासनाकडून मिळाली आहे.
किती मिळते मदत?
- मृत व्यक्तीच्या चार वारसांना लाख
- मृत जनावरे गाई, म्हशी मालकांना ३० हजार
- वासरू असेल, तर १५ हजार रुपये.
विजेपासून संरक्षण करण्यासाठी ही घ्यावी काळजी
- कोणत्याही परिस्थिती झाडाखाली आश्रय नको
- पाण्यात असाल तर त्वरित बाहेर यावे
- विद्युत उपकरणाचा वापर टाळावा
- वीज खांबाजवळ उभे राहू नका.
- गुरांना झाडाला न बांधता इतर सुरक्षित ठिकाणी बांधा.
अनेकदा झाडावर विजा कोसळतात. पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकरी झाडाखालीच थांबतात. विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये, तसेच पाण्यात असाल, तर विजा चमकत असताना त्वरित पाण्याबाहेर यावे. - देवीदास ताम्हाणे, उपजिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन.