एका दिवसात ४० किलोमीटरचा तयार झाला रस्ता; साताऱ्यात विश्वविक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 05:06 PM2021-05-31T17:06:25+5:302021-05-31T17:09:50+5:30

पुसेगाव ते म्हासुर्णे रस्ता तयार करण्याचा नवा विक्रम

40 kilometers of road completed in one day; World record in Satara | एका दिवसात ४० किलोमीटरचा तयार झाला रस्ता; साताऱ्यात विश्वविक्रम

एका दिवसात ४० किलोमीटरचा तयार झाला रस्ता; साताऱ्यात विश्वविक्रम

Next

सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा ३९.६७१ किलोमीटरचा रस्ता एका दिवसात तयार केला.  यामध्ये २५.५४ कि. मी. रस्ता हा अवघ्या १४ तासात पूर्ण करून विजापूर-सोलापूर २५.५४ कि.मी. रस्त्याचा विक्रमही मोडला असून नवा विश्वविक्रम स्थापित केला आहे. हे काम ३ शिफ्टमध्ये एकाच वेळी ६ ठिकाणी करण्यात आले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १५ अभियंत्यांनी काम पाहिले. उद्योजकामार्फत ६० अभियंते, ४७ पर्यवेक्षक, २३ गुणवत्ता नियंत्रक अभियंते, १५० वाहनचालक, ११० मजूर असे एकूण ३९० कर्मचाऱ्यांद्वारे काम करण्यात आले. 

गेल्या दोन महिन्यांपासून याचे नियोजन सुरू होतेे. अधीक्षक अभियंता संजय मुनगीलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे यांनी स्वत: सूक्ष्म नियोजन करून ते तडीस नेण्यासाठी सतत कार्यरत होते. गुणनियंत्रक पथकामार्फत कामाच्या गुणनियंत्रणासाठी बिटुमिन एक्सट्रॅक्टर, बिटुमिन पेनीट्रोमीटर, केंबरप्लेंट, सिव्हस् यासारखे साहित्य वापरण्यात आले. तसेच या कामासाठी ८ मॉडर्न बॅचमिक्स प्रकारे हॉटमिक्सर प्लॅन्ट, ७ मॉर्डन सेन्सर पेव्हर, १२ व्हायब्रेटरी रोल, ६ न्युमॅटीक रोलर १८० डंपर (हायवा) व अन्य यंत्रसामग्रींचा वापर करण्यात आला. १,१०० मे. टन डांबर व ६,००० घनमीटर खडीचा वापर करण्यात आला.

या कामासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या कामासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिल्याचे अधीक्षक अभियंता संजय मुनगीलवार यांनी सांगितले. या उपक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, उद्योजक यांचे दूरध्वनीवरून कौतुक केले. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार, मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे, आदींनी रस्त्याच्या कामाची पाहणी करत राजपथ इन्फ्राकॉनचे कौतुक केले. हा उपक्रम कौतुकास्पर असून भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रातील अभियंते व उद्योजक, कंत्राटदार यांच्यासाठी दिशादर्शी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी राजपथ इन्फ्राकॉनचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक जगदीश कदम, संचालिका मोहना कदम, अर्थ संचालक डॉ. राजेंद्र हिरेमठ, प्रकल्प संचालक शिवनाथ ढाकणे, सरव्यवस्थापक रोहिदास पिसाळ, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.

उत्कृष्ट नियोजन भव्य स्वप्न त्यासाठी गुणनियंत्रण पद्धती वापरून काम पूर्ण करण्याचा मानस, प्रयत्न व त्यात यशस्वी झाले. सर्व संबंधितांचे अभिनंदन करतो.- सदाशिव साळुंखे , मुख्य अभियंता

असा झाला विक्रम

  • या विक्रमी प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यासाठी राजपथ टीमने सूक्ष्म नियोजन केले. 
  • ३० किलोमीटरच्या या रस्त्याला सहा तुकड्यांमध्ये विभागण्यात आले. 
  • प्रत्येक भागातील काम करण्यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत होती. 
  • या कामासाठी एकूण ११,००० मेट्रिक टन बिटुमन काँक्रिट, त्यासाठी आठ हॉट मिक्स प्लांट होते. 
  • काँक्रिटचे हे मटेरिअल पसरविण्यासाठी सहा पेव्हर, १२ टँडम रोलर व सहा पीटीआर वापरण्यात आले. 
  • या मटेरिअलची ने-आण करण्यासाठी एकूण १८० हायवा टिप्पर वापरण्यात आले. 
  • प्रकल्प व्यवस्थापक, तीन हायवे इंजिनिअर, दोन क्वाॅलिटी इंजिनिअर, दोन सर्व्हेअर आणि ७१ कर्मचारी असे एकूण ७९ कर्मचारी एका टीममध्ये होते. 
  • एकूण सहा भागांचे मिळून ४७४ कर्मचारी पूर्ण कामासाठी तैनात होते. 
  • यासाठी व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली होती.

Web Title: 40 kilometers of road completed in one day; World record in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.