सेवागिरी यात्रेत ४० हजार जनावरे दाखल
By admin | Published: December 23, 2014 09:08 PM2014-12-23T21:08:17+5:302014-12-23T23:48:54+5:30
परराज्यातूनही आवक : खरेदी-विक्रीचा व्यवहार उच्चांक गाठणार
पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेतील जनावरांच्या बाजारात महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकतून सुमारे ४० हजार जातीवंत खिलार जनावरांची आवक झाली असून जनावरांच्या बाजारात खेरदी-विक्री व्यवहार तेजीत सुरू आहेत. अजूनही जनावरे दाखल होत असून या वर्षी खरेदी विक्री व्यवहार उच्चांकी होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
जातीवंत खिल्लार बैलांच्या किंमती २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आहेत. प्रदर्शनातील खिल्लार बैलांच्या किंमती ५० हजार ते ३ लाख रुपयांपर्यंत असून या बैलांच्यासाठी शेतकरी व व्यापाऱ्यांनी खास मंडप घातलेले आहेत.
या प्रदर्शनात आपला खोंड व बैल चांगला देखना दिसावा याकरता शेतकरी व व्यापाऱ्यांनी रंगीत सुती व नायलॉन कासरा, दोरखंड, वेसण, शिंब्या, झुल खरेदीसाठी दुकानात गर्दी केलेली दिसत आहे. जातीवंत खिल्लार बैल, खोंडाची शिंगे सवळून घेऊन शिंगाना वेगवेगळे कलर दिले आहेत. या यात्रेत अनेक जातीवंत खिल्लार जनावरे दरवर्षी येत असल्याने श्री सेवागिरी यात्रेला आगळे-वेगळे स्वरुप प्राप्त झाले आहे. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व पुसेगाव ग्रामपंचायतीच्यावतीने बैलबाजारात विविध ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे नळ काढून पाण्याची कायमस्वरुपी सोय केलेली आहे.
बैलबाजारात येथील पशुवैद्यकीय केंद्रामार्फत जनावरांच्या आरोग्याची देखरेख करण्यासाठी फिरते आरोग्य पथक ठेवण्यात आले आहे. बाजारात कायम स्वरुपी एका पशुवैद्यकीय स्टॉलची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शाम कदम व डॉ डी. पी. लोखंडे यांनी दिली. या केंद्रामार्फत प्रत्येक जनावरांचे लसीकरण, औषधोपचार, फिरता दवाखाना, तांत्रिक मार्गदर्शन आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्यावतीने खिल्लार जनावरांचे प्रदर्शन आयोजित केले जाते.
या प्रदर्शनातील बक्षिसपात्र जनावरांची निवड त्या क्षेत्रातील तंज्ञ पशुधन विकास अधिकारी व स्थानिक पंच कमेटीद्वारे केली जाते. अशी माहिती श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांनी
दिली. (वार्ताहर)
पाच रुपयात झुणका-भाकर
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने सध्या सुरू असलेल्या वार्षिक यात्रेत बैलबाजारातील काही हॉटेल, खानावळ चालक तसेच चहाच्या टपऱ्या मालकांना मोफत ज्वारी, बाजरीचे पीठ तसेच शेंगदाणे चटणी व मिरचीचा खर्डा देऊन येणाऱ्या भाविक, यात्रेकरुंना तसेच शेतकऱ्यांना केवळ ५ रूपयांत झुणका भाकर अन्नदानाचा उपक्रम सुरू केला आहे. सेवागिरी महाराजांच्या यात्रेसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे त्यांना जेवणाच्या सोयीसाठी हॉटेल अथवा एखाद्या ढाब्यावरच अवलंबून रहावे लागत असते. सध्याच्या महागाईच्या काळात या यात्रेत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या खिशाला चाट बसू नये म्हणून देवस्थान ट्रस्टने बैलााजारातील हॉटेल्स, खानावळी व टपऱ्यां अशा सहा ठिकाणी झुणका भाकर तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मोफत उपलब्ध करून दिले आहे. करणावळ म्हणून जेवायला येणाऱ्या मंडळींना त्या दुकानदाराला केवळ ५ रूपये द्यावे लागत आहेत. या ठिकाणी आतापर्यंत ५ हजाराच्या वर भाकऱ्यांचा शेतकऱ्यांसह अनेक गरीब लोकांनी मनमुराद आस्वाद घेतल्याचे तुकाराम नरळे यांनी सांगितले.
आज श्वान शर्यती
बुधवार, दि. २४ रोजी सकाळी ११ वा. यात्रास्थळावर भव्य श्वान शर्यतींचे आयोजन करण्यात आले असून ग्रेहाऊंड, क्रॉस ग्रेहाऊंड व कारवान, पश्मी आणि इतर सर्व जाती असे एकूण तीन गट केले जाणार आहेत. तीनही गटातील अंतिम फेरीतील प्रथम चार विजेत्या श्वान मालकांना रोख रक्कम, चषक व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.लस्पर्धेदिवशी दु. १२ पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक असून प्रत्येक श्वानास १०० रु. प्रवेश फी आकारण्यात आली आहे.
युवा महोत्सवातून लोककलेचे दर्शन
पुसेगाव : श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रेत जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या युवा महोत्सवाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. गणेश ठाकूर यांच्या हस्ते व मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, अॅड. विजयराव जाधव, सुभाषराव जाधव, एम. आर. जाधव, संदीप गिड्डे, संतोष जाधव तसेच प्राचार्य डॉ. के. एच. शिंंदे, प्रा. आर. आर. गायकवाड, प्रा. डी. पी. शिंं दे मुख्याध्यापक राजेंद्र घाडगे,युवा महोत्सव समितीचे सचिव प्रा. संजय क्षीरसागर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
या युवा महोत्सवात लोकनृत्य, पथनाट्य, सुगम गायन व समुहगीतांचे विविध नजराणे सादर करण्यात आले. जिल्ह्यातील सातारा, दहिवडी, पुसेगाव, वाई , देऊर यांच्या सह अनेक वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. जोगवा, शेतकरी नृत्य, देशभक्तीपर गीते, गोंधळ गीत, पोतराज, वाघ्या-मुरळी, पथनाट्य, समुहगीत, सुगम गायन इत्यादी कलाविष्कार सादर करण्यात आले.