कोयनेत ४० टक्के पाणीसाठा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:30+5:302021-06-24T04:26:30+5:30
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर मंदावला असून, बुधवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर साताऱ्यात ...
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर मंदावला असून, बुधवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर साताऱ्यात दोन दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. कोयना धरणात ४१.२४ टीएमसी पाणीसाठा आहे. जवळपास ४० टक्के पाणी धरणात झाले आहे.
जिल्ह्यात मागील आठवड्यात पावसाचा जोर राहिला. मंगळवारपासून शनिवारपर्यंत पाऊस पडत होता. विशेष करुन गुरूवारी सायंकाळपासून धुवाँधार पाऊस सुरू होता. कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली, तापोळा येथे तुफान अतिवृष्टी सुरू होती. त्यामुळे परिसरातील ओढे, ओघळ भरुन वाहत होते. त्यामुळे प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक वेगाने होत होती. त्याचबरोबर सातारा शहर व तालुक्यातही चांगला पाऊस झाला. या पावसामुळे पश्चिम भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर पूर्व भागाला अजूनही पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात सध्या पावसाचा जोर मंदावला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात कोयनेला १६ आणि यावर्षी आतापर्यंत ८२९ मिलिमीटर पाऊस झाला. नवजा येथे ९ व जूनपासून ९२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला ५५ मिलिमीटर पडला तर जूनपासून १०७८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात बुधवारी सकाळच्या सुमारास ४१.२४ टीएमसी पाणीसाठा झाला होता तर धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी नंतर कोयना नदीपात्रात जाते. त्याचबरोबर कोयना धरणात सकाळच्या सुमारास ८,७४४ क्युसेक वेगाने पाणी येत होते. सध्या पाण्याची आवक कमी झाली आहे.
.............................................................