अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ४०० कोटींचे नुकसान, पंचनामे सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 02:53 PM2021-07-31T14:53:43+5:302021-07-31T14:55:51+5:30
Flood Satara : सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये तब्बल ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. अजूनही बाधित गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरुच आहेत. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा समोर येणार आहे.
सागर गुजर
सातारा : जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये तब्बल ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. अजूनही बाधित गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरुच आहेत. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा समोर येणार आहे.
जिल्ह्यामध्ये दि. २२ ते २४ जुलैया कालावधीमध्ये जोराचा पाऊस झाला. या पावसामुळे नद्या, ओढ्यांना पूर आला. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. लोकांना काही समजायच्या आतच त्यांना मृत्यूने गिळंकृत केले. जिल्ह्यातील ४१६ गावांना अतिवृष्टीने आपल्या कवेत घेतले.
नद्या, ओढ्यांचे पाणी उभ्या पिकात शिरले, डोंगरावरील दगडमाती शेतात येऊन साठले. शेतांना ताली पडल्या, या पावसामुळे तब्बल ४६ जणांना मृत्यूमुखी पडावे लागले. ३ हजार ४१ पशुधनही शेतकऱ्यांनी गमावले.
प्रशासनाने युध्दपातळीवर प्रयत्न करुन बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एनडीआरएफच्या दलाने या कामात मोठी मदत होत आहे. जिल्ह्यामध्ये अजूनही एनडीआरएफच्या दोन टीमच्या माध्यमातून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरु आहे.
दुसऱ्या बाजूला महसूल, कृषी आणि ग्रामपंचायत विभागाच्या पथकाकडून एकत्रितपणे नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. जागोजागी रस्ते खचल्याने या पथकांना बाधित गावांमध्ये पोहोचण्यात अडचणी येत असून प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने रस्ते तयार करुन घेतले आहेत, चिखल तुडवतच ही पथके पंचनामे करत आहेत.
अनेक गावांमध्ये जाण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे. ज्या तालुक्यांमध्ये कमी नुकसान झाले आहे, त्या भागातील कर्मचारी नुकसानीसाठी वापरावेत, असे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत.
अतिवृष्टीमध्ये खासगी मालमत्तांसह सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांची दैना झालेली आहे. हे रस्ते नव्याने बांधावे लागणार आहे.
घाट रस्त्यांमध्ये तर ठिकठिकाणी रस्ताच राहिलेला नाही. अनेक ठिकाणी शाळा इमारतींचे नुकसान झालेले आहे. हे नुकसान कोट्यवधींमध्ये असल्याने उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे.
वीज वितरण कंपनीने वेगाने कामे हाती घेतली. ज्या गावांमध्ये वीज गायब झाली होती, त्या गावांत जीवावर उदार होऊन कर्मचारी काम करत आहेत. अनेक गावे अंधारात होती, आता त्या गावांत प्रकाश आणण्यात वीज वितरणला यश आले आहे.
तालुकानिहाय बाधित गावे
- वाई ४४, कऱ्हाड ३०, पाटण ७०, महाबळेश्वर ११३, सातारा १३, जावली १४६, सातारा ४१६
बेपत्ता व्यक्तींचा शोध लागेना...
दरडीच्या खाली दबलेले मृतदेह बाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र अनेक जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यांचा शोध लागत नसल्याचे चित्र आहे. त्यांना मृत घोषित करता येत नसल्याने अजूनही प्रशासन त्यांचा शोध घेत आहे.
मृत्यूमुखी पशुधनात वाढ
जिल्हा प्रशासनाच्यावतीने अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये पंचनामे सुरुच आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या पशुधनामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. बाधित गावांमध्ये मातीचे ढिगारे उपसण्याचे काम सुरु आहे, नदी, ओढ्यांचे पाणी कमी झाल्याने वाहून गेलेले पशुधनही आता आढळून येऊ लागले आहे. गुरुवारपर्यंत ३ हजार ४१ मयत पशुधन आढळले होते. आता त्यात वाढ होऊन ४ हजार ४१८ पशुधन मृत्युमुखी पडल्याचे आढळले आहे.