महाबळेश्वरातल्या ४00 टॅक्सी चालकांचे साताऱ्यात धरणे
By admin | Published: June 30, 2017 03:26 PM2017-06-30T15:26:47+5:302017-06-30T15:26:47+5:30
नवीन मीटर परवाने बंद करण्याची मागणी : १00 वाहनांचा ताफा धडकला आरटीओ कार्यालयात
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. ३0 : महाबळेश्वरात नवीन काळी-पिवळी टॅक्सी परवाने देऊ नयेत, या प्रमुख मागणीसाठी महाबळेश्वर स्थानिक टॅक्सी व्यवसायिक संघटनेच्यावतीने शुक्रवारी साताऱ्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले.
महाबळेश्वरातील ४00 टॅक्सी चालक १00 टॅक्सी घेऊन साताऱ्यात धडकले होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांची भेट घेऊन संघटनेतर्फे त्यांना निवेदन देण्यात आले. कार्यालय परिसरात ४00 टॅक्सी चालक एकत्र जमल्याने पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
राज्य शासनाने १९९७ साली बंद केलेले टॅक्सी परवाने खुले करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे महाबळेश्वरातील टॅक्सी व्यवसाय धोक्यात येणार आहे. महाबळेश्वर येथे महाबळेश्वरात २00१ पासून २0१७ अखेर ३७९ काळी पिवळी टॅक्सी आहे. टुरिस्ट परवाने असलेली ६00 वाहने आहेत. अलीकडच्या काळात पर्यटकही स्वत:ची वाहने घेऊन मोठ्या संख्येने येत असतात. जे पर्यटक बसने येतात, असेच टॅक्सीने महाबळेश्वर दर्शत घेतात. येथील पाँर्इंटवर जाणारे सर्व रस्ते अरुंद आहेत, तसेच वाहनतळाची मोठी गैरसोय आहे. दिवाळी, नाताळ, उन्हाळी हंगामातच टॅक्सीला व्यवसाय मिळतो व इतर बिगर हंगामात टॅक्सीला व्यवसाय मिळत नाही. अनेकांनी कर्ज काढून टॅक्सी घेतली आहे. ती कर्ज सुध्दा फिटत नाहीत. त्यामुळे हा व्यवसाय करणारे टॅक्सी व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत.
अशा स्थितीत राज्य शासनाने टॅक्सीचे परवाने सरसकट खुले केले आहेत, त्यामुळे येथे टॅक्सींची संख्या वाढणार आहे. स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना उपासमारीला सामोरे जावे लागणार आहे. या परिस्थितीत शासनाने टॅक्सी परवाने खुले करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत बावळेकर, उपाध्यक्ष अफजल मुलाणी, जनरल सेक्रेटरी अशोक ढेबे यांनी यावेळी बोलताना दिला.
...तर वाहने अन परवानेही आरटीओकडे जमा करु
शासनाने आमच्या मागणीचा विचार केला नाही, तर आमची वाहने आणि परवाने आरटीओकडे जमा केली जातील. वेळप्रसंगी उच्च न्यायालयातही जाण्याचा विचार केला असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनावेळी सांगितले.
महाबळेश्वरात पर्यटकांना टॅक्सी कमी पडत नाहीत. तरीही टॅक्सीला नवीन परवाने देण्याचा घाट शासनाने घातला आहे. वास्तविक, महाबळेश्वर व परिसर इकोसेन्सिटीव्ह झोनमध्ये येत नसल्याने रस्त्यांचे रुंदीकरण होत नाही. सध्या असणाऱ्या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे, त्यातच परवाने दिले तर आणखी वाहनांची भर पडून वाहतूक कोंडी व इतर प्रश्न निर्माण होतील. महाबळेश्वर तालुक्यापुरता नवीन परवाने देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा.
- सी. डी. बावळेकर,
अध्यक्ष, महाबळेश्वर स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटना