साताऱ्यात 'नो फ्लेक्स झोन'मध्ये फ्लेक्स लावणाऱ्यांना ४० हजारांचा दंड, कारवाईवेळी कर्मचाऱ्याला दमदाटी
By सचिन काकडे | Published: February 6, 2024 07:07 PM2024-02-06T19:07:12+5:302024-02-06T19:07:26+5:30
सातारा : सातारा पालिकेने नो फ्लेक्स झोनमध्ये फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून, पहिल्याच दिवशी चार फ्लेक्स जप्त करण्यात ...
सातारा : सातारा पालिकेने नो फ्लेक्स झोनमध्ये फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून, पहिल्याच दिवशी चार फ्लेक्स जप्त करण्यात आले. तसेच फ्लेक्स लावणाऱ्यांना प्रत्येकी दहा हजारांच्या दंडाची नोटीसही बजावण्यात आली. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून मंगळवारी दुपारी १२ वाजता पोवई नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी फलक उतरविताना एका कार्यकर्त्याकडून कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्नही केला; परंतु पथकाने कोणताही मुलाहीजा न ठेवता ही कारवाई केली.
सातारा पालिकेने शहरातील पाच ठिकाणे नो फ्लेक्स झोन म्हणून जाहीर केली आहेत. यामध्ये पोवई नाक्याचादेखील समावेश आहे. तरीदेखील प्रशासनाच्या कारवाईला न जुमानता काही मंडळींकडून या परिसरात मोठ-मोठे फ्लेक्स लावले जात होते. या फ्लेक्समुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व परिसराचे विद्रुपीकरण होत होते. फ्लेक्स लावण्यास मज्जाव केल्यास पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली जात होती. असे प्रकार सातत्याने वाढू लागल्याने प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी कठोर पावले उचलली असून, नो फ्लेक्स झोनमध्ये फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना अतिक्रमण निर्मूलन पथकाला दिल्या आहेत.
प्रशासनाकडून नो फ्लेक्स झोनबाबत मंगळवारी रितसर नोटीस जाहीर करण्यात आली. तरीदेखील काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व व्यावसायिकांकडून पोवई नाक्यावर चार ठिकाणी फ्लेक्स उभारण्यात आले. या प्रकाराची माहिती मिळताना अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन चारही फलक जप्त केले. फलक उतरविताना एका कार्यकर्त्याकडून कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्नही केला; परंतु पथकाने कोणताही मुलाहीजा न ठेवता ही कारवाई केली. तसेच फ्लेक्सधारकांना प्रति दहा हजार रुपये दंडाची नोटीसही बजावली.