सातारा जिल्ह्यात वर्षभरात तब्बल ४१ हजार नवी वाहने रस्त्यावर !
By admin | Published: March 25, 2017 01:08 PM2017-03-25T13:08:18+5:302017-03-25T13:08:18+5:30
वाहतुकीची समस्या होणार बिकट : नोटाबंदीच्या काळात प्रमाण घटले
सातारा : प्रत्येकाकडे स्वत:चे वाहन असणे हे आजकाल प्रतिष्ठेपेक्षा गरजेचे बनले आहे. त्यामुळे मोटारसायकल असो किंवा कार ही दारात हवीच, अशा अपेक्षा आता वाढू लागल्या आहेत. परिणामी वाहन खरेदीदारांची संख्या दिवसागणीक वाढतच आहे. कऱ्हाड आणि पाटण तालुका वगळता जिल्ह्यात सध्या ७ लाख ३ हजार ५४८ वाहने असून, दरवर्षी ४१ हजार नवी वाहने रस्त्यावर धावत आहेत.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वेळेला खूप महत्त्व आहे. ह्यथांबला तो संपलाह्ण या म्हणीप्रमाणे प्रत्येकजण धावत असतो. पूर्वी एखादं वाहन घरात असावं, हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जात होतं. परंतु जसा काळ बदलला तशी लोकांची विचारसरणीही बदलत चाललीय. त्यामुळे गरज ओळखून वाहन खरेदीकडे लोकांचा ओढा वाढल्याचे दिसून येत आहे. घरात जेवढ्या व्यक्ती तेवढी वाहने, असे समीकरण आता आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाहन खरेदीकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.
२०१४-२०१५ या कालावधीत ६ लाख १५ हजार ९४४ वाहनांची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. तर २०१५-२०१६ ला ६ लाख ६१ हजार ९८१ वाहने आणि २०१६-१७ ला (१७ फेब्रुवारपर्यंत) ७ लाख ३ हजार ५४८ वाहनांची नोंद झाली आहे. २०१४-१५च्या तुलनेत २०१५-१६ ला ४६ हजार ३७ तर २०१६-१७ ला ४१ हजार ५६७ वाहनांची खरेदी झाली. म्हणजे यंदा ४ हजार ४७० ने वाहनांचे प्रमाण कमी झाले. वाहन खरेदीला नोटाबंदीचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. परंतु नोटाबंदीचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा झपाट्याने वाहन खरेदी होऊ लागले आहे.
पाच वर्षांपूर्वी कऱ्हाडला स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले. त्यामुळे या कार्यालयातील वाहनांची संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे. परिणामी वाहतुकीची समस्या आणखीनच बिकट होण्याची चिन्हे आहेत. सातारा, खंडाळा, फलटण, वाई, महाबळेश्वर, माण, कोरेगाव या मुख्य तालुक्यांमध्ये वाहन पार्किंगची मुख्य समस्या भेडसावू लागली आहे. टुरिस्ट वाहनांना पार्किंगचा दाखला द्यावा लागतो. त्याप्रमाणे इतर वाहने खरेदी करतानाही पार्किंगची सोय आहे की नाही, याचा दाखला देणे वाहनधारकाला बंधनकारक करावे, अशी अपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
नोटाबंदीच्या काळामध्ये वाहन खरेदीचे प्रमाण घटले होते. परंतु त्यानंतर पुन्हा वाहन खरेदी होऊ लागली आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था तातडीने करणे गरजेचे आहे.
- संजय धायगुडे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा