जिल्ह्यातील ४१० गावे पुन्हा प्रकाशली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:39 AM2021-07-29T04:39:09+5:302021-07-29T04:39:09+5:30

सातारा : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी भूस्खलन झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब गाडले गेले तर कुठे महापुराने वाहून ...

410 villages in the district were re-illuminated | जिल्ह्यातील ४१० गावे पुन्हा प्रकाशली

जिल्ह्यातील ४१० गावे पुन्हा प्रकाशली

Next

सातारा : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी भूस्खलन झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब गाडले गेले तर कुठे महापुराने वाहून नेले. परिणामी ४२६ गावांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र गेल्या सहा दिवसांच्या अथक परिश्रमामुळे ४१० गावे पुन्हा प्रकाशमान करण्यात वीज कर्मचाऱ्यांना यश आले आहे. कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कौतुक केले आहे.

जिल्ह्यात दि. २२ व २३ जुलै रोजी जोरदार पाऊस झाला. ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलनात अनेकांचे जीव गेले. तब्बल ४२६ गावे व तेथील २ हजार ५० रोहित्रांना याचा फटका बसला. दीड हजारांहून अधिक खांब जमीनदोस्त झाले. घरगुती व व्यापारी वर्गवारीतील ६६ हजार ६५६ वीजग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला. संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले. हे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी वीजपुरवठा पूर्ववत करणे गरजेचे होते. महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी जोखीम पत्करुन हे आव्हानात्मक काम कमी कालावधीत पूर्ण करत आणले आहे.

बुधवार, दि. २८ पर्यंत ४२६ पैकी ४१० गावे पुन्हा प्रकाशमान झाली आहेत. १८१ पोल उभे करून बंद पडलेली १ हजार ५६४ रोहित्रे सुरू करण्यात आली. त्यामुळे घरगुती, व्यापारी मिळून ६४ हजार ४२४ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू झाला तर शेतीच्या १७ हजार २४४ पैकी ८ हजार ४२२ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला. सर्व मिळून ७३ हजार ८९ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात वीज कर्मचाऱ्यांना यश आले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील १६ गावांचा वीजपुरवठा बंद असून, तो सुरू करण्यासाठी महावितरणचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

(चौकट)

या गावांची वीज खंडित

महाबळेश्वर : धारे, बिरवडी, जावली, छतीरबेट, घोणसपूर व घरोशी

जावली : वहिटे, बाहुले, भूतेघर व बोंडरवाडी

पाटण : निगडे, कठनी, घोटील, जिंती व उमरकांचन

कऱ्हाड : जुझारवाडी

(चौकट)

१२ खांब उभे करून केळघर वाहिनी सुरू

अतिवृष्टीमुळे मेढा उपविभागातील केळघर उच्चदाब वाहिनीचे १२ खांब पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने १२ गावांचा वीजपुरवठा ठप्प झालेला. मंगळवारी वीज कर्मचारी व व स्थानिक ठेकेदारांच्या कामगारांनी खांद्यावर कावड करून खांब वाहून नेले. सर्व अडचणींवर मात करून कामगारांनी १२ खांब उभे केले. यानंतर केळघर, केडंबे, नांदघणे, वरोशी, पुनवडी, डांगरेघर, कुरुळोशी, धावली, तळोशी, वाळंजवाडी, वाटंबे, मुकवली, या गावांतील एकूण ७२८ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झाला.

फोटो : २८ एमएसईबी फोटो

वीज कर्मचाऱ्यांनी केळघर वाहिनीचे खांब खांद्यावर वाहून नेऊन केळघर विभागातील बारा गावांचा विद्युत पुरवठा पूर्ववत केला.

Web Title: 410 villages in the district were re-illuminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.