जिल्ह्यातील ४१६ गावे अतिवृष्टीच्या कवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:41 AM2021-07-30T04:41:01+5:302021-07-30T04:41:01+5:30

सागर गुजर सातारा : जिल्ह्यामध्ये २२, २३ व २४ जुलै रोजी आभाळ फाटल्यासारखा पाऊस झाला. या पावसामुळे नद्या, ओढ्यांना ...

416 villages in the district are in the grip of heavy rains | जिल्ह्यातील ४१६ गावे अतिवृष्टीच्या कवेत

जिल्ह्यातील ४१६ गावे अतिवृष्टीच्या कवेत

Next

सागर गुजर

सातारा : जिल्ह्यामध्ये २२, २३ व २४ जुलै रोजी आभाळ फाटल्यासारखा पाऊस झाला. या पावसामुळे नद्या, ओढ्यांना पूर आला. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. लोकांना काही समजायच्या आतच त्यांना मृत्यूने गिळंकृत केले. जिल्ह्यातील ४१६ गावांना अतिवृष्टीने आपल्या कवेत घेतले.

नद्या, ओढ्यांचे पाणी उभ्या पिकात शिरले, डोंगरावरील दगडमाती शेतात येऊन साठले. शेतांना ताली पडल्या, या पावसामुळे तब्बल ४६ जणांना मृत्युमुखी पडावे लागले. ३ हजार ४१ पशुधनही शेतकऱ्यांनी गमावले. प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एनडीआरएफच्या दलाने या कामात मोठी मदत केली.

जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच वैयक्तिक अशा एकूण मालमत्तेचे ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती निधीमधून ९ लाखांची मदत करण्यात येत आहे. मात्र, ज्यांच्या शेतांचे नुकसान झाले आहे, पिके वाहून गेली आहेत, त्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळणे आवश्यक आहे. शेतात दगडगोटे साठले असल्याने ते काढून टाकण्यासाठीही उपाययोजना करावी लागणार आहे.

११ हजार ४५२ कुटुंबे स्थलांतरित

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त ११ हजार ४५२ कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली. ४९ हजार १४९ लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. नदीकाठापासून दूर सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. शाळा, सार्वजनिक हॉल या ठिकाणी या कुटुंबांना ठेवण्यात आले.

बाधित शेतीक्षेत्र ४ हजार ३७३ हेक्टर

जमीन वाहून गेली ७८६ हेक्टर

सहा व्यक्ती अजूनही बेपत्ता...

जोरदार पावसामुळे नद्या-ओढ्यांना पूर आला. तर अनेक ठिकाणी डोंगरांवर भूस्खलन झाले. पुराच्या पाण्यात अनेक जण वाहून गेले. वाई तालुक्यातील २, पाटण तालुक्यातील १ तर सातारा तालुक्यातील ३ जण अजूनही बेपत्ता आहेत.

कोट..

जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने तत्काळ हाती घेतले. सुरुवातीला मदतकार्य करणे गरजेचे होते. आता पंचनामे पूर्ण करून बाधितांना लवकरात लवकर मदत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शेखर सिंह, जिल्हाधिकारी

Web Title: 416 villages in the district are in the grip of heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.