LokSabha2024: साताऱ्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५४.१ टक्के मतदान
By सचिन काकडे | Published: May 7, 2024 04:17 PM2024-05-07T16:17:50+5:302024-05-07T16:19:59+5:30
गोडोली येथील हे मतदान केंद्रावर मतदार राजाला बांबूची रोपे भेट देण्यात येत होती
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी सात पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. काही ठिकाणी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला तर काही ठिकाणी उन्हामुळे निरुत्साह दिसून आला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सातारा लोकसभा मतदार संघात सरासरी 54.1 टक्के मतदान झाले.
सातारा शहरात मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली. प्रत्येक मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे दुपारपर्यंत कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सातारा शहरातील मतदान केंद्रांवर वैद्यकीय मदत कक्ष, दिव्यांग कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. गोडोली येथील हे मतदान केंद्र बांबू उत्पादने आणि त्याचे उपयोग या थीमवर सजवण्यात आले होते. येथे मतदान करणाऱ्या मतदार राजाला बांबूची रोपे भेट देण्यात येत होती.
राजवाडा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमधील मतदान केंद्रालाही वाचन समृद्धी मतदान केंद्र असे नाव देण्यात आले होते. या मतदान केंद्राच्या माध्यमातून 'मतदान करणारे पाऊल समृद्ध लोकशाहीची चाहूल', 'वाचता वाचता मिळते ज्ञान करू शंभर टक्के मतदान' असे संदेश देऊन मतदारांमध्ये जागृती करण्यात आली. उन्हाची तीव्रता कमी होताच शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी हळूहळू वाढू लागली.
उमेदवारांची नावे मतदार यादीत शोधून त्यांना वोटिंग स्लिप देण्यासाठी मतदान केंद्रांच्या बाहेर बूथ उभारण्यात आले होते. त्यामुळे मतदारांना कोणत्याही त्रासाविना आपला हक्क बजावता आला. महाबळेश्वरात सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला. शहरातील ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर नागरिकांनी रांगा लावून मतदान केले. जिल्ह्यात दुपारी तीन पर्यंत 43.83 टक्के मतदान झाले होते.
तालुकानिहाय सायं ५ वाजेपर्यंतची आकडेवाडी
वाई मतदारसंघात 51.9 टक्के, कोरेगाव 57.21, कराड (उत्तर) 54.89, कराड (दक्षिण) 56.99, पाटण 50.3, सातारा 53.55 टक्के मतदान झाले.