कोविड सेंटरमधील कंत्राटी ४५० कर्मचाऱ्यांना हवी कायम नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:02 AM2021-01-08T06:02:36+5:302021-01-08T06:02:36+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर वैद्यकीय सेवा अपुरी पडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने तातडीने कंत्राटी ...

450 contract employees at Kovid Center want permanent jobs | कोविड सेंटरमधील कंत्राटी ४५० कर्मचाऱ्यांना हवी कायम नोकरी

कोविड सेंटरमधील कंत्राटी ४५० कर्मचाऱ्यांना हवी कायम नोकरी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर वैद्यकीय सेवा अपुरी पडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने तातडीने कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. या कर्मचाऱ्यांच्या बळावरच रुग्णांना वेळेवर उपचार झाले. त्यामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचले. या कर्मचाऱ्यांना कायम नोकरीत समाविष्ट करावे, अशी मागणी आता आराेग्य संघटनांकडून होऊ लागली आहे.

जिल्ह्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांमध्ये कोरोनाने हाहाकार केला. खासगी रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रेही तुडुंब झाली. रुग्णांवर उपचार वेळेत सुरू व्हावेत यासाठी साताऱ्यात कोविड जम्बो सेंटर उभारण्यात आले. यामध्ये तब्बल ४५० कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती करण्यात आली. भरती करताना अनेकांचा कालावधी हा सहा महिन्यांचा ठेवण्यात आला होता. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढत गेल्यावर या कर्मचाऱ्यांचीही मुदत वाढविली.

ऐन कोरोनाच्या महामारीत या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केले. प्रत्येकाने वेगवेगळी जबाबदारी पेलली. त्यामुळे अत्यंत सुरळीतपणे रुग्णांवर उपचार केले जात होते. परिणामी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. कोरोनाबाधित रुग्णांना चांगली सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करावे, अशी मागणी होऊ लागली, ती रास्तच आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांनी रुग्णसेवा केली. केवळ नोकरी म्हणून त्यांनी याकडे पाहिले नाही. जे शासकीय सेवेत होते, अशा काही लोकांनी कोरोनाच्या धास्तीने आजारी रजा घेऊन घरी बसणे पसंत केले. त्यावेळी मग सर्वस्वी जबाबदारी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या शिरावर घेतली. त्यामध्ये डाॅक्टरांपासून, परिचारिका, सफाई कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. १० ते १२ हजारांवर काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी या कोविड सेंटरमध्ये काम केले आहे. आमच्या कामाचे फळ आम्हाला द्यावे, अशी अनेक कर्मचाऱ्यांनी आता एकमुखी मागणी केली आहे.

कोविड सेंटरमध्ये सर्वच कंत्राटी कर्मचारी

राज्यातील इतर ठिकाणी कोविड सेंटरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सोबतीला अन् शासकीय कर्मचारीही होते. मात्र, साताऱ्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये सर्वच कर्मचारी हे कंत्राटी आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णसंख्या कमी होऊ लागलीय. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची कपात होते की काय? अशी धास्ती कर्मचाऱ्यांना लागली आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून सेवेत कायम करण्याची मागणी होत आहे.

आम्ही गेले सहा ते सात महिने या ठिकाणी काम करीत आहोत. रुग्णसेवा असो की प्रशासनाकडून सांगण्यात आलेली जबाबदारी असो; ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडली. यापुढेही आम्ही चांगले काम करू. आम्हाला शासकीय सेवेत कायम करावे.

- अनिकेत

कंत्राटी कर्मचारी

सहा महिन्यांचा अनुभव आमच्या पाठीशी आहे. कोणत्याही रुग्णालयात आम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकतो. शासनाने आमचा सहानभूतिपूर्वक विचार करून आम्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावे.

- संजय

कंत्राटी कर्मचारी

बेरोजगारीमुळे अनेकांनी निवडले कंत्राटी काम

कोरोनाच्या महामारीत उच्चशिक्षित युवक आणि युवतीही बेरोजगार झाले. त्यामुळे अनेकांनी मिळेल काम करण्यावर भर दिला. घरी बसून राहण्यापेक्षा कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू राहील, अशी धारणा प्रत्येकाची होती. कोरोनाच्या मैदानात लढून बेरोजगारीवर मात करू, अशी चंग बांधलेल्या कर्मचाऱ्यांनी आता सेवेत कायम करण्याची मागणी केली आहे.

Web Title: 450 contract employees at Kovid Center want permanent jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.