साताऱ्याला अतिवृष्टीचा फटका; पाचजणांचा मृत्यू, ४७४ गावांना बाधा, ५४९ घरांची पडझड
By नितीन काळेल | Published: August 21, 2024 06:47 PM2024-08-21T18:47:02+5:302024-08-21T18:49:29+5:30
शेतकऱ्यांचे नुकसान
सातारा : जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यातील अतिवृष्टीतील नुकसानीची माहिती समोर आली असून एकूण ४७४ गावे बाधित झाली. यामध्ये ५४९ घरांची पडझड झाली. त्याचबरोबर विविध कारणांनी पाचजणांचा मृत्यू झाला असून २९ जनावरेही दगावलीत. शेतीक्षेत्रालाही काही प्रमाणात फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी होते. विशेषत: करुन पश्चिम भागातील सातारा, जावळी, पाटण, महाबळेश्वर आणि वाई तालुक्याला याचा फटका बसतो. यंदा मात्र, जूनमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरूवात झाली होती. त्यानंतर जुलै महिन्याच्या मध्यावर अतिवृष्टी झाली. सलग १२ दिवस धो-धो पाऊस कोसळत होता. यामुळे नुकसानीच्या घटना वाढल्या. याचा फटका शेती, घरे आणि जनावरांना बसला. जून आणि जुलै महिन्यातील नुकसानीची आकडेवारी समोर आलेली आहे. त्यानुसार नुकसानीचे प्रमाण चांगलेच दिसून आलेले आहे.
जून महिन्यात अतिवृष्टी होऊन २५ गावे बाधित झाली होती. यामध्ये ४१ घरांची पडझड झाली. पाटण तालुक्यातच पावसामुळे अधिक नुकसान झाल्याचे समोर आले होते. इतर तालुक्यात किरकोळ स्वरुपात हानी झाली. तसेच जूनमधीलच अतिवृष्टीत २ गोठ्यांचेही नुकसान झाले होते. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यातील अतिवृष्टीत नुकसानीचा आकडा मोठा राहिला. पाटण, सातारा, जावळी, महाबळेश्वर आदी तालुक्यातील ४४९ गावे बाधित झाली होती. यामध्ये ५०८ घरांना फटका बसला. काही घरे भुईसपाट झाली. तर काही घरांचे अंशत: नुकसान झाले. तरीही या अतिवृष्टीने अनेकांना दुसरीकडे निवारा शोधावा लागला होता. तसेच अतिवृष्टीत एक गोठ्याचेही नुकसान झाले होते.
अतिवृष्टीच्या काळात पूर येणे व अन्य कारणाने पाच व्यक्तींना प्राणाला मुकावे लागले. जुलै महिन्यातील अतिवृष्टीतच या घटना घडल्या होत्या. तर एक व्यक्ती बेपत्ता आहे. तर जून महिन्यात १८ आणि जुलैत ११ पशुधनाचा बळी गेला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
घरांसाठी २४ लाखांचा निधी अपेक्षित..
अतिवृष्टीत घरे तसेच गोठे, पशुधन, शेतीचे नुकसान झाल्यास शासनाकडून मदत करण्यात येते. जून आणि जुलैमधील अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त घरांसाठी सुमारे २४ लाखांचा निधी अपेक्षित आहे. जूनमधील घर पडझडसाठी २ लाख ४२ हजार तर जुलैमधील घरांसाठी २१ लाख ४५ हजारांचा निधी अपेक्षित आहे. तर बाधित तीन गोठ्यांसाठी नऊ हजार रुपये मदतीसाठी लागणार आहेत. पशुधनाच्या मृत्युमुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी साडे पाच लाखांवर निधी लागणार आहे. जूनमधील पशुधनाच्या मृत्यूसाठी ३ लाख ५६ हजार तर जुलै महिन्यातील मृत जनावरांसाठी २ लाख १३ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.