अतिवृष्टीत ४९ हजार शेतकऱ्यांचा मोडला कणा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:45 AM2021-08-20T04:45:26+5:302021-08-20T04:45:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात मागील चार आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा एक-दोन नव्हे, तर ८०० हून अधिक गावांतील शेतकऱ्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात मागील चार आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा एक-दोन नव्हे, तर ८०० हून अधिक गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला. यामध्ये ८८२५ हेक्टरवरील पिकांची हानी झाली असून, ४९०५१ शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडला आहे. तर या शेतकऱ्यांचे साडेसात कोटींहून अधिक नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात चार आठवड्यांपूर्वी अतिवृष्टी झाली होती. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वर भागात मुसळधार पाऊस पडत होता. या पावसाचा फटका सर्वाधिक महाबळेश्वर, सातारा, जावळी, वाई, कऱ्हाड आणि पाटण तालुक्याला बसला. तसेच अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील जमिनी वाहून गेल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान झालेल्या सातारा, महाबळेश्वर, वाई, जावळी, कऱ्हाड आणि पाटण तालुक्यातील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यामध्ये ८८२५.७९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, तर बाधित शेतकरी संख्या ४९०५१ आहे, तर ७ कोटी ५६ लाख ३९ हजार रुपयांचे पीक नुकसान झाल्याची आकडेवारीही समोर आली आहे.
अतिवृष्टीमुळे सर्वाधिक पीक नुकसान हे पाटण तालुक्यात झाले आहे. या तालुक्यातील १९७५६ शेतकऱ्यांचे ३६३७ हेक्टरवरील पिकांचे २ कोटी ३७ लाखांचे नुकसान झाले आहे, तर कऱ्हाड तालुक्यात १४३०९ शेतकऱ्यांचे २३९१ हेक्टर पिकांचे २ कोटी ९५ लाखांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पिकांचे आणि जमिनीचे नुकसान झाले आहे. पाटणमध्ये भात आणि नाचणी पिकांची हानी झाली आहे.
जावळी तालुक्यात भात, नाचणीबरोबरच सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. कऱ्हाड तालुक्यात भात, सोयाबीन, ऊस आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर सातारा तालुक्यातही पिकांचे नुकसान झाले आहे. साताऱ्यात भात, नाचणी आणि सोयाबीन आदी पिकांची हानी झाली आहे.
चौकट :
अतिवृष्टीतील बाधित पीक क्षेत्र माहिती
तालुका नुकसान क्षेत्र (हेक्टर) बाधित शेतकरी अपेक्षित निधी
सातारा ४२७ २३७२ ३८ लाख
महाबळेश्वर १५८६ ६२४१ १ कोटी ९ लाख
वाई ५०५ ३३६९ ४४ लाख ३७ हजार
जावळी २७७ ३००४ ३२ लाख १५ हजार
कऱ्हाड २३९१ १४३०९ २ कोटी ९५ लाख
पाटण ३६३७ १९७५६ २ कोटी ३७ लाख