वाईतील विकासकामांना पाच कोटी
By admin | Published: August 31, 2014 09:39 PM2014-08-31T21:39:14+5:302014-09-01T00:04:55+5:30
मकरंद पाटील : घाट विकासाला एक कोटीची तरतूद
वाई : वाई शहरातील विविध विकास कामांसाठी आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून पाच कोटी खर्चाच्या विविध विकासकामांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून नगरपालिकांच्या प्राथमिक सोयी-सुविधा व विकासकामांच्या विशेष अनुदान योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
महागणपती मंदिरालगत नदीपात्राचे दक्षिण बाजूच्या घाट विकासासाठी क्रॉँक्रीट करण्यासाठी १ कोटी १० लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार पाटील यांनी गणेशोत्सवामध्ये वाईच्या महागणपतीला निधी अभिषेक केल्याची चर्चा भाविकांमध्ये सुरू झाली आहे.
शिवाजी उद्यान येथील जलतरण तलावाच्या वाढीव कामासाठी १ कोटी, रविवार पेठ केसरकर पाणवठा व मांगरवळी येथे अत्याधुनिक शौचालय बांधकामासाठी अनुक्रमे २५ लाख २६ हजार व २६ लाख ५५ हजार, रविवार पेठ चव्हाण पेठेकर कॉलनी येथील सांडपाणी व्यवस्था बंदिस्त गटार ३९ लाख, गंगापुरी येथे व्यायामशाळा बांधकामासाठी २८ लाख, किसन वीर चौक ते यंग रविवार चौकामार्गे जुम्मा मस्दिज, प्यासा कोल्ड्रिंक्स ते ग्रामीण रुग्णालय, किसन वीर चौक ते घोडवडेकर हॉस्पिटल, रविवार पेठ केसरकर पाणवठा जवळील साकल पुलाचे अॅप्रोच रस्ते व इतर तीन रस्ते डांबरीकरणासाठी १ कोटी ५० लाख, सोनगिरवाडी येथील चार व फुलेनगर येथील दोन गटार बांधकामासाठी ५९ लाख ७० हजार खर्चाची कामे मंजूर झाली आहे.
यापूर्वी नगरपरिषद प्रशासकीय इमारत अंतर्गत सजावट कामासाठी ३ कोटी व आठ ठिकाणच्या रस्त्यासाठी एक कोटी रक्कम मंजूर होऊन ही कामे प्रगतिपथावर आहे, अशी माहिती नगराध्यक्ष भूषण गायकवाड, आघाडीचे अध्यक्ष संजय लोळे, डॉ. अमर जमदाडे, उपाध्यक्ष सुरेखा जाधव यांनी दिली.यावेळी माजी नगराध्यक्ष नीलिमा खरात, मुख्याधिकारी आशा राऊत, नगरसेवक बुवा राऊत, अनिल सावंत, सुभाष रोकडे आदींची उपस्थिती
होती. (प्रतिनिधी)