ब वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी मिळणार पाच कोटी, राज्य शासनाचा निर्णय
By सचिन काकडे | Published: December 15, 2023 06:46 PM2023-12-15T18:46:59+5:302023-12-15T18:47:26+5:30
खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती
सातारा : शासनाने ब वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी असणारी २ कोटी निधीची मर्यादा वाढवून ५ कोटी रुपये इतकी केली आहे. या वाढीव मर्यादेचा लाभ राज्यातील सुमारे ४५० हून अधिक ब वर्ग तीर्थक्षेत्रांना मिळणार आहे. या निर्णयाबद्दल राज्यशासनासह ग्रामविकास आणि पर्यटनमंत्री गिरिष महाजन यांचे अभिनंदन व्यक्त करतो, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची २ कोटींची मर्यादा सरसकट ५ कोटी रुपये करण्यात यावी अशी मागणी, मंत्री गिरिष महाजन यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबतचे लेखी निवेदनही त्यांना देण्यात आले होते. राज्यातील काही ब वर्ग तीर्थक्षेत्रांना यापूर्वी २ कोटीपेक्षा जादा निधी देण्यात आला आहे. तीर्थक्षेत्र हे ग्रामस्थांसह भाविकांची श्रध्दास्थाने आहेत, त्यांच्या विकासात दुजाभाव न करता, सर्वच ब वर्ग तीर्थक्षेत्रांना किमान ५ कोटींचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी आमची मागणी होती.
या मागणीनुसार शासनाने धोरणात्मक निर्णय घेत राज्यातील ब वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्याची मर्यादा ५ कोटी रुपये केली आहे. राज्यातील सुमारे ४५० पेक्षा जास्त ब वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरीता एक ठोस आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आल्याने राज्यशासनाचे आभार मानतो, असेही पत्रकात नमूद केले आहे.