डॉल्बी दणाणण्यापूर्वीच ५ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:08 AM2017-09-03T00:08:56+5:302017-09-03T00:09:45+5:30
वाई : गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी वाजविण्याच्या तयारीत असतानाच वाई पोलिसांनी तिन्ही डॉल्बी जप्त केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाई : गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी वाजविण्याच्या तयारीत असतानाच वाई पोलिसांनी तिन्ही डॉल्बी जप्त केल्या. डॉल्बी असलेली ही वाहने परवानगी न घेता मॉडीफाय केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने तिघांना मिळून तब्बल पाच लाखांचा दंड ठोठावला.
वाई पोलिसांना पेट्रोलिंग करीत असताना वाई शहर, नागेवाडी तसेच मेणवली येथे डॉल्बी असलेली तीन दिसली. ती विसर्जन मिरवणुकीत जाण्याच्या तयारीत होती. तत्पूर्वीच पोलिसांनी ती जप्त केली.
पोलिसांनी वाहनांची कागदपत्रे तपासल्यानंतर त्यांच्याकडे वाहन माडीफाय केल्याचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी याबाबतची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला दिली. तिन्ही वाहनांचे क्रमांक आरटीओ कार्यालयात तपासण्यात आल्यानंतर त्यांनी वाहने मॉडीफाय करण्याची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. त्यानंतर आरटीओ कार्यालयाने तिघांना मिळून तब्बल पाच लाखांचा दंड केला.
मेणवली येथे सुनील मालुसरे यांची डॉल्बी सापडली. त्यांना १ लाख ७५ हजार, नागेवाडी येथे अनिल जायगुडे यांना १ लाख ६० हजार तर वाई शहरात केलेल्या कारवाईत अमर पवार यांना १ लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.