५ टक्के रुग्ण १६ वर्षांखालील, पण लस नाही; ५० टक्के ४५ पेक्षा कमीचे; लस असूनही नंबर नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:40 AM2021-04-22T04:40:22+5:302021-04-22T04:40:22+5:30
सातारा : जिल्ह्यात गतवर्षी कोरोनाच्या लाटेमध्ये सोळा वर्षाखालील मुलांचा बचाव झाला होता. मात्र यंदा सर्वाधिक लहान मुलांनाही कोरोनाची लागण ...
सातारा : जिल्ह्यात गतवर्षी कोरोनाच्या लाटेमध्ये सोळा वर्षाखालील मुलांचा बचाव झाला होता. मात्र यंदा सर्वाधिक लहान मुलांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु या लहान मुलांना आता लस कधी मिळणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यामध्ये सध्या ४५ वर्षावरील लोकांना लस दिली जात आहे. जवळपास ४ लाख ५० हजार लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. अद्यापही अनेकजण लसीपासून वंचित आहेत. त्यातच आता १८ वर्षावरील मुलांना लस देण्याचा शासनाचा निर्णय झाला आहे. हे एकीकडे स्वागतार्ह असले तरी १६ वर्षाखालीलही मुले यंदा कोरोनाबाधित येत आहेत. त्यामुळे पालकांची चिंता अधिकच वाढली आहे. या मुलांनाही लस दिली जावी अशी मागणी आता पालकांमधून केली जात आहे. गतवर्षी लॉकडाऊनपूर्वी शाळा बंद होत्या. त्यामुळे कोरोनापासून मुलांचा बचाव झाला. परंतु यंदा याउलट स्थिती असून सुरुवातीचे काही महिने शाळा सुरू होत्या. त्याचा संसर्ग मुलांपर्यंत पोहोचला. त्यामुळेच १६ वर्षाखालील मुलेही कोरोनाबाधित आढळून येत आहेत. आता हे प्रमाण जिल्ह्यामध्ये दोन टक्के असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही मुले कोरोनाबाधित आल्यानंतर या मुलांना घरामध्येच विलगीकरण केले जात आहे. या मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे ऑक्सिजन लेवलही उत्तम असते. त्यामुळे मुलांना घरात उपचार केले तर आरोग्य यंत्रणेवर ताण येणार नाही. मात्र अनेक पालक मुलांना दवाखान्यात दाखल करून घ्या, अशी डॉक्टरांकडे विनवणी करत असतात. जिल्ह्यात अद्यापही पंचेचाळीस वर्षे वयावरील लोक लसीपासून वंचित आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभाग, पोलीस या फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा लस देण्यात आली. अद्यापही या लोकांना दुसरा डोस देण्यात आला नाही. त्याची कारणे लसीचा तुटवडा जाणवत असल्याचे समोर येत आहे. एकंदरीत सरसकट जर लस द्यायची म्हटली तर लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होणार आहे.
चौकट: सोळा वर्षाखालील २८ रुग्ण; पण लस उपलब्ध नाही!
जिल्ह्यात आता सोळा वर्षांखालील मुलेही कोरोनाबाधित आढळून येत आहेत. ही संख्या सिव्हिलमध्ये केवळ २८ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र याहूनही अधिक मुले कोरोनाबाधित आढळून आले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मुले कोरोनाबाधित आढळून आली असून ज्या त्याठिकाणी मुलांच्यावर उपचार सुरू आहेत. या मुलांनाही लस देण्यात यावी अशी पालकांमधून मागणी केली जात आहे.
चौकट: पंचेचाळीस वर्षांखालील ८०० रुग्ण; पण लस नाही
यंदाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सरसकट सगळ्यांनाच कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून येत आहे. पंचेचाळीस वर्षाखालील ८०० रुग्ण असतानाही त्यांना अद्याप लस देण्यात आली नाही. टप्प्या-टप्प्याने ही लस दिली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून लसीचा तुटवडा होत असल्याने नेमकी ही मोहीम कशी पुढे न्यावी, अशा विवंचनेत जिल्हा प्रशासन आहे. परंतु तरीही हार न मानता प्रशासन आपल्यापरीने लसीकरण मोहिमेचा वेग वाढवतच आहे.
चौकट : मुलांसाठी लस येत नाही तोपर्यंत
सोळा वर्षाखालील मुलेही कोरोनाबाधित आढळून येत आहेत. या मुलांना वेळेवर चांगला आहार द्यावा. तोंडाला मास्क आणि वारंवार हात धुवावेत. बाहेर जाणे पूर्णपणे टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा. मुलांची प्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे मुलांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.