नोकरीच्या आमिषाने पन्नास लाखांचा गंडा
By admin | Published: October 15, 2016 01:08 AM2016-10-15T01:08:32+5:302016-10-15T01:08:32+5:30
कऱ्हाडात दोघांना अटक : चार विद्यार्थ्यांना फसविले; सातारा, पुणे, मुंबईतही फसवणूक
कऱ्हाड : राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून युवकांना बनावट नियुक्तीपत्रे देत सुमारे पन्नास लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांत चार युवकांनी तक्रार दिली असून, प्रथमदर्शनी चौदा लाखांची फसवणूक निष्पन्न झाली आहे.
कऱ्हाडप्रमाणेच सातारा, पुणे, कोरेगाव, मुंबई या ठिकाणीही आपण युवकांकडून पैसे घेतल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे फसवणुकीतील रकमेचा आकडा पन्नास लाखांपर्यंत जाण्याची चिन्हे आहेत. अनिल बाबूराव देवकर (रा. किरपे, ता. कऱ्हाड) व सुरेश मोतिलाल पल्लोर (रा. रामकुंड, सदर बझार, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दोघांनाही कऱ्हाड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून बँक आॅफ इंडियामधील नियुक्तीची बनावट कागदपत्रेही हस्तगत करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड पंचायत समितीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत असणाऱ्या शंकर आत्माराम पाटील यांचा मुलगा प्रसाद हा वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षात शिकतो. प्रसादला त्याच्याच वर्गातील मुलाने बँक आॅफ इंडियात भरती सुरू असल्याचे सांगितले. तसेच माझ्या वडिलांची बँकेत ओळख असल्याचेही तो म्हणाला. ही माहिती मिळाल्यानंतर शंकर पाटील यांनी किरपेतील अनिल देवकर याची भेट घेतली. त्यावेळी देवकरने साताऱ्यातील सुरेश पल्लोरची बँकेत ओळख असल्याचे व तो पैसे घेऊन बँकेत नोकरी लावत असल्याचे सांगितले. त्याचवेळी किरपे येथील संभाजी देवकर, विमानतळ-मुंढे येथील देवेश निकम व कोयना वसाहत येथील राजेश साळुंखे हे त्यांच्या मुलाला नोकरी लावण्यासाठी देवकरकडे आले होते. १५ मे २०१६ रोजी सुरेश पल्लोर विजयनगर येथे येणार असल्याचे सांगून त्यावेळी त्याच्याशी सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन देवकरने दिले.
विजयनगर येथे १५ मे २०१६ रोजी सुरेश पल्लोरची या सर्वांशी भेट झाली. त्यावेळी मुलांच्या मेडिकल तपासणीसाठी प्रत्येकी ६ हजार रुपये असे एकूण २४ हजार रुपये त्याने घेतले. तसेच ३० मे २०१६ रोजी सर्वांची नियुक्तीपत्र देतो, असेही त्याने सांगितले. त्याच्या सांगण्यानुसार ३० मे रोजी पुन्हा सर्वजण सुरेश पल्लोर व अनिल देवकर या दोघांना भेटले. त्या दोघांनी चौघांच्या मुलांना सीलबंद पाकिटातील नियुक्तीपत्र दिली. संबंधित नियुक्तीपत्रावर बँक आॅफ इंडियाचा शिक्का होता. त्यामुळे ती खरी असल्याचे समजून चौघांनीही प्रत्येकी साडेतीन लाख असे एकूण १४ लाख रुपये अनिल देवकर व सुरेश पल्लोर यांना दिले. २३ जून २०१६ रोजी चारही मुलांना सातारा येथे बँकेत हजर करून घेणार असल्याचे त्यावेळी पल्लोरने सांगितले होते. मात्र, नियुक्तीची तारीख होऊन गेली तरी मुलांना बोलावणे न आल्याने पालक अस्वस्थ झाले. त्यांनी देवकर व पल्लोर यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालकांनी त्या दोघांकडे पैसे परत मागितले. मात्र, ते त्यांनी दिले नाहीत. त्यामुळे गुरुवारी रात्री शंकर पाटील यांनी याबाबतची फिर्याद कऱ्हाड शहर पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी अनिल देवकर व सुरेश पल्लोर या दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून बँक आॅफ इंडियाची बनावट नियुक्तीपत्र हस्तगत करण्यात आली आहेत. सातारा, कोरेगाव, मुंबई व पुणे येथील काही युवकांकडून पैसे घेतले असल्याची कबुली पल्लोरने पोलिसांना दिली आहे. या दोघांनी पन्नास लाखांपर्यंत फसवणूक केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.