साताऱ्यात मोबाईल चोरट्यांकडून ५० मोबाईल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:47 AM2021-07-07T04:47:23+5:302021-07-07T04:47:23+5:30
सातारा : शहर व परिसरात मोबाईल चोरणारा अट्टल चोरटा पोलिसांनी गजाआड केला असून, त्याच्याकडून चोरीचे ५० मोबाईल हस्तगत केले ...
सातारा : शहर व परिसरात मोबाईल चोरणारा अट्टल चोरटा पोलिसांनी गजाआड केला असून, त्याच्याकडून चोरीचे ५० मोबाईल हस्तगत केले असून, याची किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे. विकास अशोक खंडागळे (वय २९, रा. प्रतापसिंहनगर, खेड, ता. सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवराज पेट्रोल पंपाच्या शेजारी संभाजीनगर सातारा येथे नवीन बांधकाम साईटवर पत्र्याच्या उघड्या शेडमधून दि. ९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास एकूण १० हजारांचे मोबाईल चोरी गेले होते. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, शहर व परिसरात वारंवार घडणाऱ्या मोबाईल चोरट्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर होते.
त्यादृष्टीने शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला. आरोपी अज्ञात असल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार पडताळणी करूनदेखील माहिती प्राप्त होत नव्हती. अशात गुन्हे प्रकटीकरण पथकास गोपनीय माहिती मिळाली की, शिवराज पेट्रोल पंपाच्या शेजारी संभाजी नगर सातारा येथे नवीन बांधकाम सुरू असलेल्या साईटवरील चोरीस गेलेले मोबाईल हे प्रतापसिंहनगर सातारा येथील एका व्यक्तीने चोरले आहेत. यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने तत्काळ विकास खंडागळे याला प्रतापसिंहनगर येथून ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने शिवराज पेट्रोल पंपाशेजारी संभाजीनगर सातारा येथे बांधकामाचे ठिकाणी पत्र्याचे शेडमधून मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. चोरी केलेल्या मोबाईलपैकी एक मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पोलिसांनी विकास खंडागळेला अटक करून तो कोठडीत असताना कसून चौकशी केली असता त्याने आणखी वेगवेगळ्या ठिकाणाहून मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून ५० मोबाईल हस्तगत केले असून, त्यांची एकूण किंमत ५ लाख ७०० रुपये आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आचल दलाल, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार गुलाब जाधव, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, जोतीराम पवार, शिवाजी भिसे, गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंग व विशाल धुमाळ यांनी या कारवाईत सहभाग घेतला.