साताऱ्यात ५० जणांचे उमेदवारी अर्ज मागे

By admin | Published: November 11, 2016 10:46 PM2016-11-11T22:46:38+5:302016-11-11T23:01:12+5:30

पालिका निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी ७ तर नगरसेवकपदांच्या ४० जागांसाठी तब्बल १९0 उमेदवार रिंगणात

50 nomination papers for Satara | साताऱ्यात ५० जणांचे उमेदवारी अर्ज मागे

साताऱ्यात ५० जणांचे उमेदवारी अर्ज मागे

Next

सातारा : पालिकेच्या निवडणुकीतून तब्बल ५० जणांनी शुक्रवारअखेर माघार घेतली आहे. निवडणूक अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपली असल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४ जणांनी माघार घेतल्याने नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर ४० नगरसेवक पदांसाठी ४६ जणांनी माघार घेतल्याने १९० उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत.
पालिका निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गतनिवडणुकीत तब्बल १७ जागा बिनविरोध करण्यात मनोमिलनातील साविआ व नविआ या दोन्ही आघाड्यांना यश आले होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र चित्र उलटेच पाहायला मिळत आहे. सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडी या सत्ताधारी आघाड्या एकमेकांविरोधात ठाकल्या असून, भारतीय जनता पार्टी, शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नागरी विकास आघाडी यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही आघाड्यांतील बंडखोरांसह अपक्षांनीही आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
निवडणुकीतून माघार घेण्याची मुदत शुक्रवारी संपणार होती. त्यामुळे अखेरच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज मागे घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण ती फोल ठरली. २ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर ९ दिवसांच्या कालावधीत अवघ्या ५० उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली.
खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वत: उमेदवारांशी चर्चा केली. अनेक उमेदवार या चर्चेनंतर उदयनराजेंसोबत त्यांच्या गाडीतून पालिकेत दाखल होऊन उमेदवारी अर्ज मागे घेत होते. नगराध्यक्षपदासाठी काँगे्रसच्या जिल्हाध्यक्ष धनश्री महाडिक यांच्यासह माधुरी भोसले, आरती काटे, सुजाता राजेमहाडिक यांनी निवडणुकीतून माघार घेतली. धनश्री महाडिक, भारती सोळंकी यांनी दमयंतीराजे भोसले यांच्यासोबत गाडीतून येऊन उमेदवारी अर्ज मागे घेतले. गत निवडणुकीत विरोधी बाकावर बसलेले नगरसेवक कल्याण राक्षे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत येऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातर्फेही नगरविकास आघाडीच्याविरोधातील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भाने हालचाली सुरू होत्या. अनेक अपक्षांनी माघार घेतल्याचा दावा नगरविकास आघाडीतर्फे करण्यात आला.

उमेदवार धावला... पण वेळ संपली !
अर्ज माघारी घेण्यासाठी एक उमेदवार काही मोजक्याच कार्यकर्त्यांसह पालिकेत धावतच आला. मात्र मुदत संपल्याने त्याची उमदेवारी कायम राहिली..आता लढूया..पडतील तेवढी मतं पडतील, असं म्हणून त्याच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी त्याला सावरलं..
सातारा पालिकेतील मनोमिलन दुभंगल्याच्या निमित्ताने अनेकांच्या राजकीय इच्छा आकांक्षांना बळ मिळाले. गल्लो-गल्लीतून अनेकजण निवडणूक लढविण्यास इच्छुक झाले. काहीजण पालिकेच्या कारभारावर ठपका ठेवत तर काहीजण ‘काहीतरी’ मिळेल या आशेने रिंगणात उतरले. ज्यांना आपले ध्येय साध्य झाले, असे वाटले त्यांनी मुदतीपूर्वीच अर्ज माघारी घेतले. परंतु अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत ‘वाटाघाटी’मध्ये व्यस्त असलेल्या काही उमेदवारांना कोणीच दाद दिली नसल्याचे शुक्रवारी पालिकेत पाहायला मिळाले. अर्ज माघारी घेण्याची मुदत दुपारी तीनपर्यंत होती. तीनला दहा मिनिटे बाकी असताना निवडणूक कर्मचाऱ्याने मुदत संपत असल्याचे निवेदन वाचून दाखविले. बरोबर तीनच्या काट्यावर सभागृहातील दरवाजा बंद केला गेला. आतील लोकांना बाहेर अन् बाहेरील लोकांना आतमध्ये सोडले जात नव्हते. तीन वाजून दहा मिनिटांनी एक अपक्ष उमेदवार धापा टाकतच पालिकेत आला.
यावेळी त्याच्यासोबत चार ते पाच मोजकेच युवक होते. बाहेर उभ्या असलेल्या पोलिसांनी त्याला वेळ निघून गेल्याचे सांगितले. हे ऐकून त्याचा चेहरा हिरमिसूला झाला. ‘चलं रे काही होत नाही..लढू निवडणूक.. किती मतं पडतील ते पडतील,’ असं म्हणून त्याचे मित्र त्याला सावरत होते. तुम्हाला मी सांगत होतो ना की त्याचा फोन येणार नाही म्हणून तुमच्यामुळेच वेळ झाला, असा संताप तो उमेदवार व्यक्त करत होता.
खरंतर त्या उमेदवाराला निवडणूक लढवायचीच नव्हती, असं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. त्याच्या चार-दोन मित्रांनी त्याला हुलीवर बसविले होते. काहीवेळानंतर तो अपक्ष उमेदवार आणि त्याचे मित्र पालिकेतून निघून गेले. (प्रतिनिधी)




 

Web Title: 50 nomination papers for Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.