दिवाळीसाठी दुकानदाराकडे मागितली ५० हजारांची खंडणी; ‘रयत क्रांती संघटने’च्या जिल्हाध्यक्षासह दोघांवर गुन्हा
By दत्ता यादव | Published: November 13, 2023 12:39 PM2023-11-13T12:39:02+5:302023-11-13T12:39:50+5:30
सातारा : भुसार माल खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानदाराला दिवाळीसाठी ५० हजारांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून ‘रयत क्रांती संघटने’च्या जिल्हाध्यक्षांसह दोघांवर सातारा ...
सातारा : भुसार माल खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानदाराला दिवाळीसाठी ५० हजारांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून ‘रयत क्रांती संघटने’च्या जिल्हाध्यक्षांसह दोघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. जिल्हाध्यक्ष मधुकर एकनाथ जाधव (सध्या रा. कोयना सोसायटी, सदर बझार, सातारा, मूळ रा. कोरेगाव), हणमंत बाबूराव साबळे (रा. शिवथर, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रसन्ना राजमाने (रा. आरळे, ता. सातारा) यांचे आरळे, ता. सातारा येथे स्वामी समर्थ ट्रेडर्स नावाचे भुसार माल खरेदी-विक्रीचे दुकान आहे. डिसेंबर २०२१ मध्ये दुकानदार राजमाने यांना संशयित मधुकर जाधव यांनी फोन करून दिवाळीसाठी आम्हाला ५० हजार रुपये द्या, अशी मागणी केली होती. त्यावेळी राजमाने यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर जानेवारी २०२२ मध्येही राजमाने यांना फोन करून पुन्हा पैशाची मागणी करण्यात आली. ‘तुझ्याविरुद्ध आम्ही बाजार समितीत बोगस मालाबाबत तक्रा करू,’ अशी धमकी दिली. त्यामुळे राजमाने यांनी त्यांच्या पत्नीच्या फोन-पे मोबाइलवरून १० हजार रुपये त्यांना पाठविले. त्यानंतर संशयित दोघे पुन्हा आले नाहीत.
दरम्यान, ८ नोव्हेंबर २०२३ रोजी बाजार समितीमधून सचिन मोरे यांनी फोन करून ‘तुमच्याविरुद्ध मधुकर जाधव यांनी तक्रार केली आहे. तुम्ही येथे या,’ असे राजमाने यांना सांगितले. राजमाने हे बाजार समितीत गेले असता तेथे वरील दोघे संशयित होते. राजमाने मोरे यांना भेटल्यानंतर त्यांनी मालाच्या पावत्यांवर व्यवस्थित सह्या करा, असे सांगितले. याचवेळी मधुकर जाधव व हणमंत साबळे यांनी राजमाने यांच्याकडे दिवाळीसाठी पुन्हा ५० हजारांची खंडणी मागितली. या प्रकारानंतर राजमाने यांनी घरी जाऊन त्यांच्या पत्नीला हा प्रकार सांगितला. पत्नी योगिता राजमाने यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
दुकानासमोर आरडाओरडही..
खंडणी देण्यास नकार दिल्याने संशयितांनी ९ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता दुकानासमोर जाऊन राजमाने यांना शिवीगाळ केली. ‘तुम्ही ग्राहकांना फसवता, तुम्ही दुकान कसे चालविता तेच बघतो,’ अशी धमकी दिल्याचे राजमाने यांनी तक्रारीत नमूद केले आहे.