सेवागिरी यात्रेत ५० हजार जातिवंत जनावरे

By admin | Published: January 11, 2016 10:06 PM2016-01-11T22:06:12+5:302016-01-12T00:35:47+5:30

पुसेगाव : राज्यासह उत्तर कर्नाटकातून जनावरे दाखल; खरेदी-विक्रीचा व्यवहार गाठणार उच्चांक

50 thousand species of animals in Savagiri yatra | सेवागिरी यात्रेत ५० हजार जातिवंत जनावरे

सेवागिरी यात्रेत ५० हजार जातिवंत जनावरे

Next

पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेतील जनावरांच्या बाजारात महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकतून सुमारे ५० हजार जातिवंत खिल्लार जनावरांची आवक झाली असून, जनावरांच्या बाजारात खेरदी-विक्री व्यवहार तेजीत सुरू आहेत. अजूनही जनावरे दाखल होत असून, या वर्षी खरेदी-विक्री व्यवहार उच्चांकी होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
पुसेगाव येथील जातिवंत खिल्लार जनावरांचा बाजार महाराष्ट्रासह इतर राज्यातही चांगलाच प्रसिद्ध असल्याने महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटक या भागातून खिल्लार जनावरे यात्रेमध्ये हजारो जनावरे सहभागी झाली आहेत. यामध्ये सातारा, सोलापूर, बारामती, सांगली, खरसुंडी तसेच विविध जिल्हा व राज्यातून शेतकरी व व्यापाऱ्यांनी आपले खिल्लार बैल, खोंड तसेच गायही विक्रीसाठी आणले आहेत. या बैल बाजारात जातिवंत बैलांची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसत
आहे.
जातिवंत खिल्लार बैलांच्या किमती २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आहेत. प्रदर्शनातील खिल्लार बैलांच्या किमती ५० हजार ते ३ लाखांपर्यंत असून, या बैलांच्यासाठी शेतकरी व व्यापाऱ्यांनी खास मंडप घातलेले आहेत. या बैलांच्या देखरेखीसाठी शेतकरी व व्यापाऱ्यांनी खास काही माणसे नेमलेली आहेत.
बैलबाजारात येथील पशुवैद्यकीय केंद्रामार्फत जनावरांच्या आरोग्याची देखरेख करण्यासाठी फिरते आरोग्य पथक ठेवण्यात आले आहे. बाजारात कायम स्वरूपी एका पशुवैद्यकीय स्टॉलची उभारणी करण्यात आली, असल्याची माहिती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शाम कदम व डॉ. डी. पी. लोखंडे यांनी दिली. या केंद्रामार्फत प्रत्येक जनावरांचे लसीकरण, औषधोपचार, फिरता दवाखाना, तांत्रिक मार्गदर्शन आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत.
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने खिल्लार जनावरांचे प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनातील बक्षीसपात्र जनावरांची निवड त्या क्षेत्रातील तज्ज्ञ पशुधन विकास अधिकारी व स्थानिक पंच कमिटीद्वारे केली जाणार आहे. या बक्षीस पात्र जनावरांसाठी एकूण बारा गटांचा समावेश आहे, अशी माहिती श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचेअध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली. बुधवार, दि. १३ रोजी जनावरांच्या निवडीसाठी होणार आहेत. दुष्काळजन्य परिस्थिती असताना देखील श्री सेवागिरी खिल्लार जातिवंत प्रदर्शनात हजारो बैल दाखल झाले असून, कोट्यवधींचे व्यवहार सुरू आहेत. (वार्ताहर)


आज श्वान शर्यती
पुसेगाव येथे यात्रेनिमित्त मंगळवार, दि. १२ रोजी सकाळी ११ वाजता यात्रास्थळावर भव्य श्वान शर्यतींचे आयोजन करण्यात आले असून, स्पर्धेसाठी ग्रेहाऊंड, क्रॉस ग्रेहाऊंड व इतर सर्व जाती असे एकूण दोन गट केले जाणार आहेत. दोन्ही गटातील अंतिम फेरीतील प्रथम चार विजेत्या श्वान मालकांना अनुक्रमे १०,०००, ७,०००, ५,०००, ३,००० रुपये रोख रक्कम, चषक व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. स्पर्धेदिवशी दु. १२ पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

Web Title: 50 thousand species of animals in Savagiri yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.