मनपात पाच वर्षांत ५०० कोटींचा घोटाळा
By admin | Published: September 19, 2015 11:54 PM2015-09-19T23:54:18+5:302015-09-19T23:58:54+5:30
सुधीर गाडगीळ : मुख्यमंत्र्यांकडून ‘नगरविकास’ला चौकशीचे आदेश
सांगली : महापालिकेत गेल्या पाच वर्षांच्या काळात सुमारे ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे २०१० ते २०१५ या पाच वर्षांतील कालावधीचे विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी नगरविकास खात्याला चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आ. सुधीर गाडगीळ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे यापूर्वीही उघडकीस आली आहेत. यापूर्वीच्या विशेष लेखापरीक्षणातून गैरव्यवहार चव्हाट्यावर आले होते. आता मागील पाच वर्षांच्या कालावधीचे लेखापरीक्षण होणे गरजेचे आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना नुकतेच आम्ही निवेदन सादर केले. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावरील सर्व प्रकल्पांची चौकशी झाली पाहिजे. एकात्मिक झोपडपट्टी विकास योजनेतही मोठा गैरव्यवहार झाला आहे. यातून झालेल्या कामांचेही लेखापरीक्षण झाले पाहिजे. संबंधित बांधकामाचा दर्जा तपासण्याची गरज आहे. स्थायी समितीच्या सभांमध्ये ऐनवेळी कोट्यवधी रुपयांचे विषय घुसडण्यात आले आहेत. आणीबाणीच्या काळात तातडीच्या उपाययोजना म्हणून महापालिका अधिनियम १९४९च्या कलम ६७ (३) क नुसार करावयाच्या कामांचे अधिकार आयुक्तांना असतात. गेल्या पाच वर्षांत या कलमाचा गैरवापर करून झालेल्या कामांचीही चौकशी झाली पाहिजे.
या सर्व प्रकरणांचे सविस्तर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रत्यक्ष दिले आहे. केंद्र व राज्य शासनाकडून महापालिकेला देण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या निधीचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली आहे. याची गंभीर दखल घेऊन फडणवीस यांनी नगरविकास खात्याला चौकशीचे आदेश दिले आहेत. लवकरच महापालिकेच्या या सर्व कारभाराची चौकशी सुरू होईल. या सर्व प्रकरणांचा विचार केला, तर महापालिकेत मोठा घोटाळा घडल्याचे दिसून येईल. चौकशी तातडीने सुरू होऊन ती पूर्ण करण्यासाठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत. जनतेच्या पैशाची चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली उधळपट्टी रोखणे तसेच शहराच्या भल्याच्या गोष्टी महापालिकेमार्फत घडाव्यात, या दृष्टीने आम्ही हे पाऊल उचलले आहे, असे त्यांनी सांगितले. विशेष लेखापरीक्षणाच्या यापूर्वीच्या प्रकरणांचे पुढे काय झाले, याबाबतही पाठपुरावा करण्यात येत आहे. ही प्रक्रिया गतीने पूर्ण व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न राहतील. असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, मुन्ना कुरणे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, प्रकाश बिरजे, केदार खाडिलकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पाणी खासगीकरण हवेच कशाला ?
पाणीपुरवठा खासगीकरणाविषयी आ. गाडगीळ म्हणाले की, महापालिकेकडे एवढी मोठी यंत्रणा असताना खासगीकरण हवेच कशाला? पारदर्शीपणाने व योग्य नियोजन केले तर चांगली वसुली केली जाऊ शकते. त्यामुळे खासगीकरणाचा हा प्रयत्न चुकीचा आहे.
...सक्षम आयुक्तांची गरज
- सध्याच्या आयुक्तांनी लोकहिताची कामे केली पाहिजेत. महापालिकेला सक्षम आयुक्त असावेत, ही मागणी योग्यच आहे. सध्याच्या आयुक्तांनी मिळालेल्या काळात चांगले काम करावे, अन्यथा आम्ही आयुक्त बदलाबाबतही शासनाकडे मागणी करू, असा इशारा गाडगीळ यांनी दिला.
- नगरोत्थान योजनेतून मंजूर असलेल्या महापालिका क्षेत्रातील ड्रेनेज योजनेतही मोठा गैरव्यवहार निदर्शनास येत आहे. १६ कोटी रुपयांची कामे मंजूर नसतानाही करण्यात आली असून, ठेकेदाराला आठ कोटी रुपये काम होण्यापूर्वीच अदा करण्यात आले आहेत.
- ड्रेनेज योजनेच्या केवळ कामाबाबत चौकशीची मागणी न करता आम्ही यातील तांत्रिक गोष्टींचीही चौकशी व्हावी, यासाठी पाठपुरावा करीत आहोत. त्यासंदर्भातील कागदपत्रांचीही तपासणी केली जाईल, असे गाडगीळ यांनी सांगितले.
विशेष लेखापरीक्षण आवश्यकच : महापौर
महापालिकेच्या २०१० ते १५ या कालावधितील विशेष लेखापरीक्षणाची आ. सुधीर गाडगीळ यांनी केलेली मागणी योग्यच आहे! आम्हालाही हीच अपेक्षा आहे. ज्यांनी या कालावधीत चुकीचा कारभार केला असेल, त्या गोष्टी लोकांसमोर उजेडात येतील. त्यामुळे लेखापरीक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत महापौर विवेक कांबळे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.