‘किलकारी’ घेणार ५१ हजार गर्भवती महिलांची काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 09:11 PM2024-02-13T21:11:47+5:302024-02-13T21:11:59+5:30
आरोग्यविषयक माहिती मिळणार : मातांनाही फायदा; आरोग्य विभागाकडून सुरुवात
सातारा : केंद्र शासनाने ‘किलकारी’ ही गर्भवती महिला आणि मातांसाठी नवीन योजना सुरू केली असून, सातारा जिल्ह्यातही याला प्रारंभ झाला आहे. या अंतर्गत, या योजनेतून आता जिल्ह्यातील ५१ हजार गर्भवती महिलांची काळजी घेतली जाणार असून, आरोग्यविषयक माहिती मिळणार आहे.
केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘किलकारी’ ही नवीन योजना आणि आशा सेविकांसाठी मोबाइल अकादमी सुरू करण्यात आलेली आहे. महिला व बालकांच्या आरोग्यविषयक विकासासाठी ही योजना आहे. सध्या देशातील १८ राज्यांत ही योजना सुरू आहे. त्यात महाराष्ट्र हे एक राज्य समाविष्ट आहे. ‘किलकारी’ म्हणजे बाळाचे खिदळणे. ही केंद्रीकृत संवादात्मक ध्वनिप्रतिसाद आधारित मोबाइल आरोग्यसेवा आहे.
सातारा जिल्ह्यातही या योजनेला सुरुवात झाली आहे. जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. महेश खलिपे यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलेला गावातील आशा सेविकेकडे नोंदणी करावी लागणार आहे. यामध्ये नोंदणीकृत गर्भवती महिलेला चाैथ्या आठवड्यापासून बाळ एक वर्षाचे होईपर्यंत औषधे, आहार, लसीकरण, मानसिक आणि शारीरिक स्थिती, आदींबाबत मोबाइलवर मोफत मार्गदर्शन मिळणार आहे; तर सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षी डिसेंबर महिनाअखेरपर्यंत सुमारे ५१ हजार गर्भवती महिलांची नोंद झालेली अहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
किलकारी म्हणजे बाळाचे खिदळणे. ही केंद्रीकृत संवादात्मक ध्वनिप्रतिसाद आधारित मोबाइल आरोग्यसेवा आहे. सातारा जिल्ह्यातही ही योजना सुरू झाली आहे. याअंतर्गत गर्भवती महिला आणि मातांची काळजी घेतली जाणार आहे. ही योजना माता आणि बालकाच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. तसेच बाळाची कशा प्रकारे काळजी घ्यावी याबाबत मातांमध्ये जागरूकता आणेल.
- डाॅ. सुनील चव्हाण, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी