नवीन करन्सी पाहण्याचा बहाणा करून ५२ हजार लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 02:28 PM2019-06-03T14:28:38+5:302019-06-03T14:29:58+5:30
आम्ही फॉरेनर आहोत, असे इंग्रजीमध्ये सांगून नवीन करन्सी पाहण्याचा बहाणा करून ५२ हजारांची रोकड हातचलाखीने दोघांनी लुटून नेल्याची घटना सदर बझारमध्ये घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघा परदेशी तरूणावर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : आम्ही फॉरेनर आहोत, असे इंग्रजीमध्ये सांगून नवीन करन्सी पाहण्याचा बहाणा करून ५२ हजारांची रोकड हातचलाखीने दोघांनी लुटून नेल्याची घटना सदर बझारमध्ये घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघा परदेशी तरूणावर गुन्हा दाखल झाला आहे.
सदर बझारमध्ये एन. एस. एटंरप्रायजेस या नावाचे दुकान आहे. या दुकानात १ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास प्रताप हौसेराव पाटील (वय ४६, रा. शाहुनगर, गोडोली सातारा) हे कामामध्ये नेहमीप्रमाणे व्यस्त होते. त्यावेळी दोन युवक तेथे आले. त्यांनी दुकानात येताच इंग्रजीमध्ये संभाषण सुरू केले.
आम्ही फॉरेनर असून, नवीन करन्सी आम्हाला पाहायची आहे, असे पाटील यांना त्यांनी सांगितले. यावर पाटील यांनी त्यांच्या हातात पैशाचा बंडल दिला. ते दोघे पैसे न्याहळत असताना पाटील काऊंटरपासून थोडे पुढे गेले. त्याचवेळी दोघांपैकी एका फॉरेनरने हातचलाखी करून ५२ हजार रुपयांची रोकड असलेला बंडल लांबविला.
संबंधित दोघे फॉरेनर तेथून निघून गेल्यानंतर आपण फसलो गेल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी दुकानात असलेला सीसीटीव्ही पाहिला असता संबंधितांनी हातचलाखी करून पैसे कसे चोरले, हे स्पष्ट पाहायला मिळाले.
या प्रकाराची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व माहिती घेतली. तसेच दुकानातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले. संबंधित चोरट्यांनी टोपी घातली होती. त्यांच्या दिसण्यावरून दोघेही परदेशातीलच असावेत, असे पाटील यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.