कऱ्हाड उपविभागात ५२७ हिट अॅण्ड रन !
By Admin | Published: December 11, 2015 10:37 PM2015-12-11T22:37:52+5:302015-12-12T00:13:42+5:30
बहुतांश प्रकरणात ‘तपास चालू आहे’ !: अनेकांचा बळी, शेकडोजण जायबंदी; बेदरकार चालक अद्यापही मोकाट; पोलीस हतबल--कऱ्हाड फोकस
संजय पाटील -- कऱ्हाड -महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर वाहनांचा वेग वाढला; पण हा वाढता वेग पादचाऱ्यांच्या जिवावर बेततोय. वाऱ्याशी स्पर्धा करताना अनेकवेळा वाहनाची पादचाऱ्याला धडक बसते. काही चालक अपघातानंतर वाहन तेथेच थांबवतात. मात्र, अनेकवेळा पादचाऱ्याला ठोकर मारून चालक वाहनासह पसार होतात. कऱ्हाड पोलीस उपविभागात गेल्या पाच वर्षांत अशा ‘हिट अॅण्ड रन’च्या तब्बल ५२७ घटना घडल्यात. अपवाद वगळता या सर्व प्रकरणांचा तपास अद्यापही ‘पेंडिंग’ आहे.
हिट अॅण्ड रनच्या अनुषंगाने कऱ्हाड उपविभागाचा आढावा घेण्यात आला असता, उपविभागामध्ये गेल्या पाच वर्षांत पाचशेहून अधिक ‘हिट अॅण्ड रन’च्या घटना घडल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. अपवाद वगळता अनेक गुन्ह्यांचा तपास पोलिसांना लावता आलेला नाही. सरासरी दर आठवड्याला महामार्गावर अशा प्रकारची घटना घडते. वाहनचालकांच्या असंवेदनशीलतेमुळे आत्तापर्यंत शंभरहून अधिक बळी गेले आहेत. महामार्ग देखभाल विभागाचा नाकर्तेपणा, चुकीच्या पद्धतीने महामार्ग ओलांडणे, सेवा रस्त्यावरून वेगात वाहने चालविणे आदी कारणे अपघातास कारणीभूत ठरतात. महामार्गासह सेवा रस्त्यावर ‘हिट अॅण्ड रन’च्या घटना घडत असल्या तरी राज्यमार्गांवरील घटनांचा आकडाही मोठा आहे. महामार्गावर होणाऱ्या अशा बहुतांश अपघातांना रस्ते देखभाल विभागच कारणीभूत असल्याचे दिसते. महामार्गावर अनेक ठिकाणी संरक्षक जाळ्या तुटल्या आहेत. त्यामधून चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न पादचारी करतात.
तसेच महामार्गावर वाहनाच्या वेगाचा अंदाज येत नाही. मात्र, तरीही पादचारी चुकीच्या पद्धतीने महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करतात. ज्याठिकाणी असे चुकीचे मार्ग आहेत ते बंद करण्याची जबाबदारी रस्ते देखभाल विभागाची आहे. मात्र, ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली जात नसल्याने ‘हिट अॅण्ड रन’ला निमंत्रण मिळते. गेल्या काही दिवसांपूर्वी कऱ्हाडनजीक दोन व्यक्तींना अज्ञात वाहनाने ठोकर दिली होती. संबंधित जखमींना महामार्गावरून बाजूला घेणे गरजेचे होते. मात्र, तशी माणुसकी कोणीही दाखविली नाही. ज्या वाहनाने अपघात केला ते वाहन तेथून पसार झाले. तसेच इतर वाहनेही संबंधित जखमींच्या अंगावरूनच गेली. परिणामी, त्या दोन्ही व्यक्तींची ओळख पटणेही मुश्किल झाले. असे अपघात दर आठवड्याला कऱ्हाड उपविभागामध्ये होतात. त्यातील शेकडो वाहनचालक आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
वास्तविक, ‘हिट अॅण्ड रन’च्या बहुतांश घटना सायंकाळनंतर घडतात. त्यामुळे त्या कोणाच्या लक्षात येत नाहीत.
जखमीस मदत मिळणे गरजेचे असताना कोणाचेही लक्ष नसल्याने त्याला आपला जीव गमवावा लागतो. अशा घटना टाळण्यासाठी महामार्ग देखभाल विभागानेच उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहराच्या हद्दीत वाहनांचा वेग कमी असणे गरजेचे असते. मात्र, प्रत्यक्षात वाहनांचा वेग थोड्या प्रमाणातही कमी होत नाही. तसेच वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही उपाययोजना महामार्गावर नाही.
आरोपी सापडेपर्यंत फाईल ‘ओपन’
आजपर्यंत ठराविक अपघातातच धडक देणारे वाहन व चालक पोलिसांच्या हाती लागले आहेत. अन्यथा बरेच वाहनचालक पसार होऊन अपघाताच्या खाणाखुणा मिटवून बिनधास्त आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी अथवा भविष्यात कधी जर तो अपघाताची जाणीव होऊन पोलीस ठाण्यात आलाच तर त्याची चौकशी व्हावी, यासाठी ‘हिट अॅण्ड रन’च्या प्रत्येक गुन्ह्याची फाईल आरोपी सापडेपर्यंत न्यायालयाच्या परवानगीने ‘ओपन’ ठेवली जाते, असे पोलीस सांगतात.
‘एफआयआर’मध्ये वाहनचालक अज्ञात
अपघात करून वाहनासह चालक पसार झाला तर स्थानिक पोलिसांकडून त्याचा तपास होतो. संबंधित वाहन कोणी पाहिले आहे का, याची प्रथम चौकशी केली जाते. वाहनाचा क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न होतो. त्यातून वाहनाच्या चालकापर्यंत पोहोचता येते. मात्र, वाहनाबाबत कसलीच माहिती मिळाली नाही तर अज्ञात वाहनचालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला जातो.