माणच्या बाजार समितीसाठी ५३ जण रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:40 AM2021-07-30T04:40:06+5:302021-07-30T04:40:06+5:30
वरकुटे-मलवडी : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तिरंगी होणार हे निश्चित झाले असून, १७ जागांसाठी ५३ जण ...
वरकुटे-मलवडी : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तिरंगी होणार हे निश्चित झाले असून, १७ जागांसाठी ५३ जण रिंगणात उतरले आहेत. आमदार जयकुमार गोरे, शेखर गोरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर अनिल देसाई गट व राष्ट्रीय काँग्रेस पार्टी अशी आघाडी झाली आहे.
माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये १७ उमेदवार निवडून द्यावयाचे असून, सर्वसाधारण सोसायटी मतदार संघातून ७ जागांसाठी २१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महिला राखीवमधील दोन जागांसाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. इतर मागास प्रवर्गातून एका जागेसाठी तीन अर्ज दाखल आहेत. भटक्या विमुक्त जाती-जमातीमधून एका जागेसाठी तीन अर्ज दाखल आहेत, अशा पद्धतीने सोसायटी मतदार संघातील ११ जागांसाठी उमेदवार रिंगणात आहेत. तर ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण गटातील दोन जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. अनुसूचित जातीसाठी एक जागा असून, त्यासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. आर्थिक दुर्बल घटकाच्या एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. व्यापारी मतदार संघातील दोन जागांसाठी सहा उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
बाजार समितीच्या १७ जागांसाठी एकूण ५३ उमेदवार रिंगणात असून, यापैकी दोन उमेदवार अपक्ष आहेत. गुरुवार, दि. २९ रोजी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
(चौकट)
वैभव मिळवून देण्याची गरज...
अडचणीत सापडलेल्या बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अखेर फोल ठरले आहेत. बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे पगारसुद्धा निघत नाहीत. निवडणुकीसाठी सुमारे पाच लाख खर्च अपेक्षित आहे. तो खर्च भरण्याची कुवतही बाजार समितीची नाही. शेतकऱ्यांना बाजार समितीमधून बाजारभावसुद्धा कळत नाही. त्यामुळे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था बाजार समितीची झाली आहे. नुकसानात असलेल्या बाजार समितीला चांगल्या स्थितीत आणण्याची मोठी जबाबदारी राजकीय पक्षांच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे.