दोन बसच्या धडकेत ५६ प्रवासी जखमी
By admin | Published: September 22, 2016 01:01 AM2016-09-22T01:01:38+5:302016-09-22T01:01:38+5:30
कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्गावर
पाटण : कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्गावर पाटणनजीकच्या तामकडे एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका वळणावर रत्नागिरी, गुहागर या दोन आगारांच्या एसटी बसेसची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोन्ही बसमधील ५६ प्रवासी जखमी झाले असून, एसटी चालकासह सातजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी दुपारी दीड वाजता झाला.
पुणे-रत्नागिरी ही निमआराम बस बुधवारी दुपारी दीड वाजता पाटणहून रत्नागिरीकडे निघाली होती, तर चिपळूणहून गुहागर-पुणे ही एसटी बस पाटणकडे येत होती. या दोन्ही एसटी बस पाटणहून चार किलोमीटर असलेल्या तामकडे एमआयडीसीनजीक आल्या असता त्यांची समोरासमोर भीषण धडक झाली. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी बालंबाल बचावले. या अपघातात रस्त्याच्या कड्यावरून खाली एखादी बस कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.
गुहागर ते पुण्याकडे जाणाऱ्या एसटीमध्ये एकूण ४० प्रवासी होते. पुणे ते रत्नागिरीकडे जाणाऱ्या बसमध्ये एकूण २० प्रवासी होते. अपघातानंतर सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून पाटण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रस्त्यावरून कोणी खाली उतरायचे, या विचारात दोन्ही चालक असल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. अपघातामुळे दोन्ही बसचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)
पाटण रुग्णालयाची तारांबळ !
पाटण ग्रामीण रुग्णालयात एक तर कर्मचाऱ्यांची टंचाई आणि वादविवाद. त्यातच एसटी अपघात झाल्यामुळे पाटण ग्रामीण रुग्णालयातील दोन
डॉक्टर, दोन परिचारिका, सफाई व सुरक्षा कर्मचाऱ्यांची ५६ जखमी प्रवाशांवर उपचार करताना एकच तारांबळ उडाली.
------------
अपघातातील जखमी प्रवासी
उमेश शिवतारे (एसटी चालक, रत्नागिरी आगार), महादेव पास्टे (वय ३०), संजय पास्टे (३२), पांडुरंग येवले (४०), मधुकर पास्टे (३०), संतोष संकपाळ (३५), अरविंद नानीजकर (४५), इंदुबाई डोके (६०), मुरलीधर सोलकर (३५), सुनील पवार (४१), सुयांग आग्रे (२४), रामचंद्र घाणेकर (६०), प्रीती भोसले, आकाश भुवड, प्रीती बारटक्के, मनोहर भुवड (सर्व रा. गुहागर), सुरेश चव्हाण, मनस्वी कदम, वैशाली कदम, स्वाती सांजळे, सचिन जाधव, देवेंद्र घाग (सर्व रा. चिपळूण तालुका), सायली चव्हाण, हृषीकेश राजेशिर्के, मनीषा राजेशिर्के, रामकृष्ण शालगर, सुधीर चव्हाण (सर्व रा. सातारा), अशोक चव्हाण, सुवर्णा चव्हाण (सर्व रा. वाई), जमील लंबे, धोंडूबाई कुंभार (सर्व रा. पुणे), पृथ्वीराज वाघमारे, राजेंद्र बनकर (रा. बारामती), उमेश पांडे, अंजली मोरे, अजित मोरे (सर्व रा. पाटील सडा), सुमित्रा बाजे (तासवडे), किसन लाड (किसुर्डे), मधुरा जोशी (रा. संगमेश्वर), रोहन साळवी (महाड), अजित खेडे अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत. यामध्ये गुहागर एसटीचे चालक मुकुंद कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत.