कोयनेच्या प्रलयंकारी भूकंपास ५६ वर्षे पूर्ण, कटू आठवणींनी आजही उडतो थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 12:01 PM2023-12-11T12:01:32+5:302023-12-11T12:02:01+5:30
आतापर्यंत बसले लाखाहून अधिक भूकंपाचे धक्के
नीलेश साळुंखे
कोयनानगर : कोयना परिसरातील महाप्रलंयकारी भूकंपास सोमवारी ५६ वर्षे पूर्ण होत आहेत. ११ डिसेंबर १९६७च्या काळरात्रीने हजारो घरे बेचिराख करत संसार उद्ध्वस्त केले. शेकडो निष्पापांना जीव गमवावा लागला होता. आजही या कटू आठवणीने थरकाप उडतो. गत ५६ वर्षात या भूकंपाच्या भेगा बुजल्या. पण, जखमा अजूनही भळभळत आहेत. सोमवारी, कोयनानगर येथील तीन मंदिरात प्रशासकीय अधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत भूकंपामध्ये मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
कोयना भागासह पाटण तालुक्यातील अनेक गावांना ११ डिसेंबर १९६७ रोजी पहाटे ४ वाजून २१ मिनिटांनी बसलेल्या ६.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरवून टाकले होते. कोयना भागासाठी ही काळरात्र ठरली. कारण या भूकंपाच्या धक्क्याने १८५ जणांना आपला प्राण गमवावा लागला. सुमारे ४० हजारावर घरे बाधीत झाली. ९३६ पशुधन यामधे दगावले. तसेच अनेक ठिकाणी जमिनीना मोठ्या भेगा पडल्या.
त्या काळरात्री झोपताना उद्याची नवी स्वप्न पाहणारे काळाच्या झोपेतून उठलेच नाहीत, तर अनेकांना या धक्क्याने जायबंदी केले. चवली पावली साठवत हाडाची काडं करून घामाच्या धारा वाहताना, पोटाला चिमटा घेत उभारलेला संसार निसर्गनिर्मित संकटाने क्षणात मातीमोल झाला. या घटनेचे साक्षीदार असलेली वयोवृद्ध मंडळी आजही भूकंपांच्या भयावह आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू वाहतात.
या दुर्घटनेनंतर महाराष्ट्राचे पोलादी पुरूष, तत्कालीन महसूलमंत्री, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी थेट तालुका गाठला. परिस्थितीची पाहणी करत जनतेस आधार देण्याचा प्रयत्न केला. बाधित कुटुंबियांसमवेत थांबून मायेची ऊब दिली. संसारोपयोगी साहित्याची मदत व हजारो नवीन घरांची उभारणी केली.
दरम्यान, १९६३ सालापासून कोयना भूकंपमापक केंद्रावर भूकंपाच्या नोंदी घेण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत १ लाख २१ हजार ५२३ भूकंपाचे धक्के या भागाने सोसले आहेत.
शंभूराज देसाईंमुळे भूकंपग्रस्तांना दिलासा
१९६७ च्या विनाशकारी भूकंपाच्या भेगा मुजल्या असल्या तरी भूकंपग्रस्तांच्या जखमा ताज्या व भळभळणाऱ्या आहेत. भूकंपप्रवण क्षेत्राचा शिक्का असल्यामुळे येथे नवीन उद्योग, प्रकल्प उभे राहात नाहीत. त्यामुळे येथील युवक पोटाची खळगी भरण्यासाठी शहराचा रस्ता धरत आहेत. तसेच १९९५ मध्ये बंद पडलेले भूकंपग्रस्त दाखले तत्कालीन आमदार व विद्यमान मंत्री शंभूराज देसाई यांनी २०१५ मध्ये सुरू केले. त्यातून अनेक तरुणांना लाभ होत आहे.
आजपर्यंत १ लाख २१ हजार ५२३ भूकंपाचे धक्के
- ३ रिश्टर स्केल पेक्षा कमी: १,१९,७४७
- ३ ते ४ रिश्टर स्केल: १,६७१
- ४ ते ५ रिश्टर स्केल : ९६
- ५ रिश्टर स्केलपेक्षा जास्त : ९
भूकंपाची मालिका सुरूच
आजपर्यंत झालेल्या १ लाख २१ हजारपेक्षा जास्त भूकंपांपैकी १,६११ भूकंपाचे धक्के कोयना भागामध्ये जाणवले नाहीत. तर चालू वर्षी १ जानेवारीपासून आजपर्यंत ११३ भूकंपांची नोंद झाली असून, यापैकी ११२ धक्के तीन रिश्टर स्केलपेक्षा कमी, तर १ धक्का तीन ते चार रिश्टर स्केलच्या दरम्यान होते. वर्षभरात केवळ ५ धक्के जाणवले नाहीत.